Amol Kolhe Viral Video: खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग सध्या जोरदार सुरु होते, अशातच त्यांचा घोड्यावरून पडून अपघात झाल्यानंतर काही दिवस प्रयोगांना विश्रांती दिलेली आहे. ही घटना घडण्याआधी कोल्हे यांनी कोल्हापुरात ६ एप्रिलला शिवपुत्र संभाजी नाटकाचा एक प्रयोग केला होता. या प्रयोगाच्या आधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला अमोल कोल्हे यांना भेटायला येतो आणि त्याला बघता क्षणी अमोल कोल्हे या बाळाच्या पाया पडतात. काही सेकंदात नेमकं असं घडतं तरी काय याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना, चला तर पाहूया…
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना टॅग करून हा व्हिडीओ कोल्हापूरच्या प्रयोगाच्या वेळी शेअर करण्यात आला होता. यामध्ये अमोल कोल्हे हे मंचावर उपस्थित होते तितक्यात एक महिला आपल्या बाळाला घेऊन स्टेजवर पोहोचली. या बाळाने केलेला पेहराव पाहून अमोल कोल्हे यांनी झुकून बाळाला मुजरा केला व त्याच्या पाया पडले. हा क्षण पाहून उपस्थिती भारावून गेले होते, नंतर अमोल कोल्हे यांनी या महिलेची चौकशी केली.
दरम्यान, याच प्रेक्षकांच्या भेटीदरम्यान, कोल्हेंना भेटण्यासाठी अनेक लहान मुले आली होती, तसेच काही कलाकारांनी त्यांचे शिवपुत्र संभाजी या रूपातील चित्र रेखाटून भेट केले होते.
दरम्यान, आता ११ ते १६ मे दरम्यान पुन्हा एकदा नाटकाच्या प्रयोगासाठी अमोल कोल्हे सज्ज झाले आहेत. दुखापतीनंतर त्यांनी स्वतः हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर करत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. “पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं!थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही” असे आपल्या चाहत्यांना सांगितले होते.