स्त्रियांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आपल्या समाजात सगळीकडे दिसते. भाषा बदलली तरी मानसिकता आणि प्रवृत्ती तीच असल्याची उदाहरण पहायला मिळतं. चारचौघांमध्ये मोठमोठ्या आधुनिक बाता मारणारे लोकांचे खरे चेहरे ‘त्यांचा त्यांचा’ ग्रुप जमल्यावर समोर येतात. मग त्यावेळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबतही त्यांनाच जबाबदार ठरवण्याची सरसकट भाषा केली जाते. तोंडदेखलं ‘महिलांचा सन्मान करावा’ची भाषा बोलणारे इतके दिवस त्यांच्या मनात सााठलेलं वैफल्य बाहेर काढतात. त्यांना हे वैफल्य येण्यामागे तेच जबाबदार असतात. पण या सगळ्यासाठी स्त्रियांनाच जबाबदार धरलं जातं.
या अशा गप्पा आपल्या अवतीभवती आपण पुष्कळ पाहतो. आपल्या देशात आणि आसपासच्या प्रदेशात ही अशा प्रकारची मानसिकता असणारच हे आपण जवळजवळ गृहित धरलेलं असतं. पण पाश्चात्त्य देशांमध्ये असं घडत नाही असं मानलं जातं.
आता हा पुढचा व्हिडिओ पाहा…
सौजन्य- बीबीसी, फेसबुक
हा प्रसंग आहे तो युरोपियन युनियनच्या पार्लमेंटमधला. आधुनिक काळात ज्या युरोपने सगळ्या जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशी मूल्यं दिली त्या युरोपच्या पार्लमेंटमध्ये, म्हणजे लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या सदनात ही भाषा वापरली गेली! व्हिडिओमध्ये दिसणारा संसद सदस्य पोलंडचा युरोपियन पार्लंमेंटमधला प्रतिनिधी आहे.
‘स्त्रिया कमजोर असता, दुबळ्या असतात, त्यांची क्षमता कमी असते, पुरूषांपेक्षा त्या कमी असतात. या सगळ्या कारणांमुळे त्यांना पुरूषांपेक्षा कमी पगार दिला गेला पाहिजे’ असे भयानक उद्गार या साहेबांनी काढले.
त्यांच्या या वाक्यांमुळे साहजिकच पार्लमेंटमधलं वातावरण तापलं. युरोपियन पार्लमेंटमधली स्पेनची महिला प्रतिनिधी उठून उभी राहिली आणि तिने फक्त शारिरीक भेदांमुळे व्यक्तीव्यक्तींमध्ये भेदभाव करणाऱ्या लिंगभेदी आणि बुरसटलेल्या विचारांच्या या म्हाताऱ्याला चांगलंच खडसावलं
‘मी इथे तुमच्यासमोर एक महिला आणि या पार्लमेंटची सदस्य म्हणून समान दर्जाने बसले आहे याचा तुम्हाला त्रास होतोय हे मला स्पष्ट दिसतंय. तुमच्यासारख्या ‘पुरूषां’पासून समस्त युरोपमधल्या महिलांचं रक्षण करण्यासाटी मी इथे आलेले आहे. आणि माझं हे काम मी निर्भीडपणे सुरू ठेवणार आहे’
काही सेकंदांपूर्वीच मग्रूर होत मध्ययुगीन आवेशात बाष्कळ बडबड करणाऱ्या या साहेबांची दातखीळ बसली होती. पण दाखवणार कसं? म्हणून फक्त ‘हेहेहे’ करत नामदारसाहेब खाली बसले.
अशा सामाजिक प्रश्नांबाबत देश बदलला तरी मानसिकता बदलल्याशिवाय काहीच होणार नाही हेच यावरून स्पष्टपणे पटतं.