देशातील वेगवेगळ्या भागात लोकांवर कुत्र्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लिफ्टमधील मुलावर आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटनेनंतर आता केरळमधील एका भागात सायकल चालवणाऱ्या मुलावर रस्त्यावरील कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एका १२ वर्षांच्या मुलावर रस्त्यावरच्या कुत्र्याने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नुकत्याच देशातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या मालिकेतील ही ताजी घटना आहे. अरक्किनार येथील गोविंदा विलासम शाळेजवळील एका अरुंद गल्लीत आपल्या घरासमोर सायकल चालवणाऱ्या नूरसवर एका भटक्या कुत्र्याने उडी मारली. रविवारी दुपारी हा मुलगा सायकल चालवत एका घराजवळ थांबला असताना ही घटना घडली.
कुत्रा अचानक धावत आला आणि त्याने नूरसवर हल्ला केला. यावेळी त्याने त्याच्या पायाचा आणि हाताचा चावा घेतला. जेव्हा नूरसने कुत्र्याला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याला ओढले आणि त्याच्यावर वार केले. काही सेकंदाच्या झटापटीनंतर नूरस शेजारील घरामध्ये जाण्यास यशस्वी ठरला. यानंतर त्या कुत्र्याने तिथून पळ काढला. यानंतर काही शेजाऱ्यांनी लगेचच नूरसकडे धाव घेतली.
नूरसच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पायावर आणि हातावर चावल्याच्या जखमा असून त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवरही जखमेच्या खुणा आहेत. याच कुत्र्याने रविवारी कोझिकोडमध्ये इतर पाच जणांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांचे वारंवार हल्ले होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.