Seema Kanojiya Viral Video: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) च्या प्लॅटफॉर्मवर अश्लील डान्स व्हिडिओ शूट करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या समक्ष सर्वांची माफी मागत तिने व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. पण या एका वादातून बाहेर पडताच आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा नवा व्हिडीओ या तरुणीने शेअर केला आहे. जवळपास ६ लाखाच्या आसपास फॉलोवर्स असणाऱ्या सीमा कनोजियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे स्टेशन परिसरात गलिच्छ हालचाल करत नाचतानाचे अनेक व्हिडीओ आहेत. ज्यावर टीका करणाऱ्यांची संख्या ही तिच्या फॉलोवर्स इतकीच मोठी आहे.
सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करतानाचा एक नवीन व्हिडीओ आता सीमाने पोस्ट केला आहे. यामध्ये ती सीएसएमटी स्थानकावर काळ्या रंगाचे कपडे घालून विचित्र प्रकारे नाचताना दिसत आहे, यावेळी बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीला तिचा धक्का लागतो यानंतर थांबायचं सोडून ती उलट त्या व्यक्तीला रुळाच्या दिशेने पुन्हा ढकलण्याचा प्रयत्न करते. यामध्ये व्यक्तीच्या कानातील ब्लूटूथ सुद्धा खाली पडते ज्यावरून संतापलेला तो इसम सीमाच्या कानाखाली मारायला जातो. डोक्याला हात लागल्यावर सीमा खाली पडते आणि मागून दोन जण येऊन त्या इसमाला मारल्याचा अभिनय करतात. हे घडत असताना सीमा परत उभी राहून घाणेरड्या पद्धतीने नाचू लागते. हे सगळं तिने स्वतःच्याच अकाउंटवर शेअर करत हा आम्ही ठरवून केलेला व्हिडीओ आहे असेही स्पष्टीकरण दिले आहे.
सीमाचा नवा वादग्रस्त Video
सीमाचा माफीनामा
दरम्यान, पोलिसांना दिलेल्या माफीपत्रात सीमाने लिहिले होते की, “मला माझी चूक मान्य आहे आणि मी भविष्यात असे कृत्य पुन्हा करणार नाही.माझ्या तिच्या चाहत्यांनी आणि फॉलोवर्सनी सुद्धा रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनच्या आत रील बनवू नयेत, कारण परवानगीशिवाय असे करणे गुन्हा ठरते ज्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते.” दरम्यान हे माफीनाट्य संपताच दहाच दिवसांनी तिने हा सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे.