Mumbai Local Dog Viral Video: इथे ना कुणी महान, इथे ना कुणी लहान, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकालाच मिळे चौथ्या सीटचा मान.. याच नियमाने चालणाऱ्या मुंबई लोकलमधील एक नवा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आजवर तुम्ही प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला ट्रेनमधून प्रवास करताना पाहिलं असेल पण आज प्रवासाला चक्क एक कुत्रा निघाला होता. त्या कुत्र्याचं ट्रेनमध्ये चढून, जागा मिळवणं आणि त्याही पेक्षा ट्रेनमध्ये उतरणं पाहून मुंबईकरांनी याला ‘मानाचा प्रवासी’ अशी पदवी कमेंट्स मध्ये देऊनच टाकली आहे. एरवी लोकलमध्ये विथभर जागेसाठी भांडणारे मुंबईकर या सहप्रवाशाची वाह्ह वाह्ह करताना थकत नाहीयेत, पण नेमकं असा या चार पायाच्या प्रवाशाने केलंय तरी काय? चला बघूया..
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शननुसार, हा कुत्रा खारघरहून सीएसएमटी ट्रेनमध्ये चढला होता. फार गर्दी नव्हती पण तरी आधी आत गेल्यावर त्याला जरा गुदमरल्यासारखं, गोंधळल्यासारखं झालं होतं. जेव्हा ट्रेन स्टेशन सोडून पुढे निघाली तेव्हा तो सराईत प्रवाशासारखा दरवाजाजवळ आला आणि हातावर हात ठेवून बसला. थोडं ऊन होतं पण दार थंडगार वाऱ्याचा आणि बाहेरच्या हिरवळीचा आनंद घेत तो मस्त बसून होता. नंतर सीबीडी बेलापूर स्टेशन येताच जसं काही आपण ठरवूनच आलो होतो अशा पद्धतीने तो ट्रेन थांबायच्या आधीच ट्रेनमधून उतरून निघून पण गेला. तुम्हाला हे वाचून कदाचित अजूनही असं कसं होईल ना? असा प्रश्न पडला असेल तर तुम्हीच आधी हा व्हिडीओ पाहा.
Video : कुत्र्याचा मुंबई लोकलमधून आलिशान प्रवास
हे ही वाचा<< Holi Video: वृंदावनात अर्धनग्न नर्तिकांसह मद्यधुंद बिल्डर्सचं अश्लील सेलिब्रेशन; लोकांचा संताप, पोलीस म्हणाले..
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी कमेंटमध्ये हा कुत्रा आपल्या ओळखीचा असल्याचे सुद्धा सांगितले आहे. एका युजरने कमेंट करत म्हटले की, “मी खारगरमध्ये कॉलेजला असताना हा कुत्रा खारघर स्टेशनवर नेहमी दिसायचा. तेव्हा पण तो असाच प्रवास करायचा. आठ वर्षांपूर्वी मी त्याला पाहिलं होतं आणि आता पुन्हा बघून मन अगदी भरून आलं” तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, “सकाळचा रूट खारघर पासून आणि संध्याकाळी पुन्हा टिळक नगर पासून हा कुत्रा रोज प्रवास करतो.” काहींनी या क्लिपवर मस्करीत कमेंट करत ,”बरोबर आहे, फक्त भाव भाव करून थोडी घर चालतं, बिचारा सगळं फिरून जेवण आणायला जात असेल”, “हा नक्की त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला जात असणार असं म्हटलं आहे.
तुम्हाला हा मानाचा प्रवासी कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.