मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे सोमवारी पहिल्यांदाच ठाण्यामध्ये आले. यावेळी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदारही उपस्थित होते. पाऊस आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामध्ये एका खास गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले ते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने यावेळेस ढोल वादन करुन आनंद व्यक्त केला. सध्या शिंदे यांच्या पत्नी म्हणजेच मिसेस मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या ढोल वादनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
नक्की वाचा >> “…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य
शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा गड असलेल्या ठाणे शहरात त्यांच्या समर्थकांना त्यांची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी शिंदे ठाण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांना मिळाली होती. त्यामुळे सकाळपासून शिंदे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली होती. टेंभीनाका येथील आनंद आश्रमास फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मुंबई आणि ठाणे शहराची सीमा असलेल्या आनंदनगर जकातनाका येथे एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच शिंदेसमर्थक जमले होते.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”
आनंदनगर जकात नाक्यावर मोठय़ाप्रमाणात पडलेले खड्डे आणि पावसाची मुसळधार सुरू असूनही शिंदे यांच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मुख्य मार्गालगतच त्यांची वाहने उभी केली होती. त्यामुळे आनंदनगर जकातनाका ते कांजूरमार्गपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. शहरात मुख्यमंत्री शिंदे रात्री ९ च्या सुमारास दाखल झाले. आधी त्यांनी आनंदनगर येथे शुभेच्छा स्वीकारल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे गेले. तेथेही ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
नक्की वाचा >> फडणवीसांना ‘उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या शरद पवारांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “अजित पवार…”
टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळय़ाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर भर पावसातही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या समर्थक शिवसैनिकांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी शिंदे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. तेथेही ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ते लुईसवाडी येथील आपल्या निवासस्थानी दाखल झाले. तेथेही सेवारस्त्यावर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पावसामध्येही समर्थकांचा उत्साह थोडाही कमी झाला नाही. फटाके, गुलाल, बॅनर्स, जल्लोष आणि ढोल ताशांच्या सोबतीला पाऊसही होता. यावेळी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता यांनी ढोल ताशा पथासोबत ढोल वाजवून आनंद साजरा केला.
डोक्यावर गुलाल, वरुन पडणारा पाऊस अशा वातावरणामध्ये मिसेस मुख्यमंत्री घरासमोर जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या ढोल ताशा पथकातील तरुणांसोबत ढोल वाजवू लागल्या. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
रात्री उशीरा निवासस्थानी पोहोचल्यानंतर शिंदे यांचे कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता, सून वृषाली यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी आपला नातू रुद्रांशला पाहताच शिंदे यांनी त्याला लगेच जवळ घेतले. यावेळी त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.