Famous Singer Crying On Stage Video: प्रसिद्द भोजपुरी गायिका प्रियंका सिंह हिचा थवे महोत्सव २०२३ मधील ऑनस्टेज रडतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पवन सिंह व प्रियंका सिंह ही गायक जोडी भोजपुरी गाण्यांमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. असे असतानाही प्रियंका सिंह हिला थवे महोत्सवात निवेदिका रूपमी त्रिविक्रम हिच्याकडून हीन दर्जाची वागणूक देण्यात आली, इतकेच नव्हे तर गायिकेच्या हातातून चक्क माईक खेचून घेण्याचा सुद्धा प्रकार घडला. याच्या निषेधार्थ प्रियंकाने स्टेजवरूनच उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली यादरम्यान तिला तिचे अश्रू रोखता आले नाहीत. पण नेमकं इतकं अपमानास्पद घडलं तरी काय हे पाहूया…
व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, प्रियंका गात असताना अचानक निवेदिका मध्येच येऊ बोलू लागली. यावरून प्रियंकाने तिला एक मिनिट थांबा असे सांगितले, ज्यावर निवेदिकेने तिला मॅडम जरा आरामात असं म्हणत रागाने प्रतिक्रिया दिली. यावर प्रियंकाने तुम्ही चुकीचं करताय असे म्हणताच निवेदिका आणखी भडकली. तिने गाणाऱ्या प्रियंकाच्या हातातून माईक खेचण्याचा प्रयत्न केला आणि मग स्वतःच्या माइकवरून खाली बसलेल्या जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना ती स्टेजवर आमंत्रित करू लागली.
प्रियंका सिंह पुढे व्हिडिओमध्ये म्हणते की, “मी गाण्यासाठी मरत नाहीये. तुम्ही मला इथे परफॉर्म करण्यासाठी बोलावले आहे, त्यामुळे तुम्ही माझा (बिहारच्याच स्थानिक कलाकार मुलीचा) असा अनादर करू शकत नाही. जिल्हा प्रशासन चुकीचे आहे. मला थावे फेस्टिव्हलमध्ये खूप वाईट अनुभव आला.”
हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी निवेदिका रुपम त्रिविक्रमवर ताशेरे ओढले आहेत. अभिनेत्री अक्षरा सिंगनेही ट्विटरवर गायिकेला पाठिंबा दिला आहे. “हे लोक (आयोजक) हे विसरले आहेत की रंगमंचाची एक शिस्त असते, कलाकाराचा, स्त्रीचा अपमान करण्यासाठी आपल्या शक्तीचा तमाशा करत आहेत.”
या व्हिडिओमुळे सोशल मीडिया यूजर्स सुद्धा भडकले आहेत, एका वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले की, “हे किती असभ्य आहे? जर तुम्ही एखाद्या कलाकाराचा आदर करू शकत नसाल, तर त्याला/तिला कोणत्याही कार्यक्रमात बोलावू करू नका. पूर्णपणे चूक आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “हे घृणास्पद आहे, कोणाच्याही प्रतिष्ठेला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचवू नये.”