Delhi Metro Viral Video: कलेला वय, लिंग, जागेचं बंधन नसतं असं म्हणतात. पण हे वाक्य काहींनी इतकं मनावर घेतलंय की खरोखरच कुठलीच मर्यादा न बाळगता बेभान रीलबाजी केली जात आहे. आपल्या मनोरंजनाच्या साधनांमध्ये जेव्हापासून इन्स्टाग्राम रील्सचं वर्चस्व वाढायला लागलंय तेव्हापासून एकीकडे कॉन्टेन्टची संख्या वाढायला लागली असली तरी दर्जा दिवसागणिक घसरत चालला आहे. रील्समधून व्हायरल होण्यासाठी कुणी ऑनलाईन मारामाऱ्या करतंय, कुणी रेल्वे स्टेशनवर झोपून व्हिडीओ काढतंय, कुणी अश्लील हावभावच काय करतंय, थोडक्यात काय प्रत्येकजण प्रसिद्ध होण्यासाठी आटापिटा करतोय. या दर्जाहीन व्हिडीओजचं वाढतं प्रमाण पाहता कुठेतरी यावर अंकुश ठेवणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे. ही गरज अधोरेखित करण्याचं सध्याचं निमित्त म्हणजे असाच एक विचित्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी टीकेची झोड घेतली आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये अशाप्रकारचा अश्लील नृत्याचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक रीलस्टार्सनी मेट्रोमध्ये अक्षरशः बिकिनी घालून मेट्रोमधून प्रवास केला आहे. काही वेळा अगदी भरजरी कपडे घालूनही अश्लील हातवारे, इशारे करत नाचताना व्हिडीओ बनवले आहेत. आता व्हायरल होणाऱ्या तरुणीने सुद्धा मेट्रोमध्ये स्कर्ट टॉप घालून ट्वर्क करत व्हिडीओ बनवला आहे. आता ट्वर्क करणं हा नृत्याचाच भाग झाला पण त्यासाठी मेट्रोला मंच बनवणं हे काही योग्य नाही, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटत आहेत. गंमत म्हणजे ही तरुणी नाचत असताना मागे एक काकू उभ्या दिसत आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना प्रचंड धक्का बसलाय हे स्पष्ट दिसतंय.

Video: मेट्रोमध्ये विचित्र डान्स; काकू घाबरल्या

हे ही वाचा<< नरेंद्र मोदींनी ‘हिंदुत्वाचे कार्ड’ राजकारणात खेळल्याची कबुली दिली? Video मध्ये म्हणाले, “हा निवडणुकीचा अजेंडा नाही तर.. “

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करताना या तरुणीवर तर टीकेची झोड घेतली आहेच. पण त्यासह काकूंची पण अनेकांना काळजी वाटतेय. काकूंना हा प्रकार बघून आता थेरपी घ्यावी लागेल असंही काहींनी लिहिलंय. विशेष म्हणजे मागे जेव्हा एका तरुणीचा बिकिनी घालून केलेला मेट्रो प्रवास व्हायरल झाला होता तेव्हाच दिल्ली मेट्रोने कपड्यांच्या बाबत तसेच मेट्रोमधील प्रवासात पाळायच्या नियमांच्या बाबत नियम घालून दिले होते. त्यानंतर वारंवार चालू असलेले हे प्रकार पाहता दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कठोर कारवाई केलेली नाही हेच स्पष्ट होतेय.