Viral Video: मुलीचं लग्न म्हटलं की, कपडे, दागिने, भांडी, आहेर, मान-पान या सगळ्या गोष्टींची घरचे खूप आधीपासून तयार करतात. आपल्या मुलीला सासरी जाताना शक्य तितक्या गोष्टी द्याव्या असं त्यांना वाटतं. मुलगी सासरी गेल्यावर ती परकी होणार ही भावना आजही प्रत्येक आई-वडिलांच्या मनात असते, त्यामुळेच तिची पाठवणी करताना ते खूप भावनिक होतात. लग्न ठरल्यापासून ते लेक सासरी जाईपर्यंत त्यांच्या मनात घालमेल आणि डोळ्यांत आसवांचा पूर वाहत असतो. शिवाय मुलींनाही आपल्या माहेरच्यांचा निरोप घेणं कठीण जातं. हा हळवा क्षण दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही भावूक व्हाल.
आजी-आजोबा आणि नातवंडं यांचं खूप खास नातं असतं. आजी-आजोबा नातवंडांना खूप जीव लावतात, चांगल्या गोष्टी शिकवतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका नातीचा आणि आजोबांचा असाच एक हळवा क्षण पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्न मंडपामध्ये वधू-वर हळदीसाठी बसले असून यावेळी वधूजवळ तिचे आजोबा येतात आणि तिला हळद लावायला सुरुवात करतात. यावेळी हळद लावताना तिचे आजोबा तिला काहीतरी सांगतात, ज्यामुळे वधू रडायला सुरुवात करते. यावेळी आजोबा त्यांच्या खिशातील रूमाल काढून तिचे डोळे पुसायला सुरुवात करतात. आजोबा आणि नातीमधील हे प्रेम पाहून सोशल मीडियावर नेटकरीही अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @aishwarya_pawar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “आजोबांचे प्रेम”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “आजोबांचं प्रेम ते नसताना ही जाणवतं आणि डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा कळतं की किती जीव लावलाय”, आणखी एकाने लिहिलेय, “खूप सुंदर, नितळ प्रेम” आणखी एकाने लिहिलेय, “आजोबा खूप खास असतात.”