स्त्रियांनी काहीही नवीन करायला घेतलं की हे वाक्य त्यांना एकदातरी एेकावं लागतंच. मग ते काम ती बाई का करतेय, काय परिस्थितीतून ती मार्ग काढायला धडपडतेय याचा विचार करायला कोणालाही फुरसत नसते. पण तथाकथित ‘पुरूषांची कामं’ करण्यापासून त्या बाईला नेहमी रोखलं जातं.
भेटा शन्नो बेगमला. वरच्या फोटोमध्ये दिसतेय तशाच मनमोकळ्या आणि दिलदार स्वभावाच्या शन्नो बेगमने जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाला निधडेपणाने तोंड दिलं आणि ती तिच्यावर मुलांसोबत आयुष्यात पुढे जातच राहिली.
दहावीही न शिकलेल्या शन्नो बेगमच्या नशिबी मारकुटा नवरा आला. अशा खडतर वैवाहिक जीवनात चार मुलं पदरी पडल्यानंतर अचानकपणे तिच्या नवऱ्याचं निधन झालं. रोजच्या मारहाणीतून सुटका झाली खरी पण आता तिच्या आणि तिच्या चार मुलांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न बिकट बनला. आपल्या कुटुंबाचं रहाटगाडगं चालू रहावं यासाठी तिने भाजी विकण्यापासून ते लोकांच्या घरची धुणीभांडी करण्यापर्यंत सगळं करून पाहिलं. पण खाण्यापिण्यापुरतेही पैसे सुटत नव्हते. ‘उबर’ आणि ‘ओला’ अॅप्सने चालणाऱ्या टॅक्सीच्या व्यवसायाकडे तिचं लक्ष गेलं आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तिने हा व्यवसाय करायचा ठरवला.
पण याच्यासाठी लागली कमीतकमी शैक्षणिक पातळी म्हणजे दहावीही तिने पूर्ण केली नव्हती. तिने दहावीची परीक्षा पुन्हा देऊन पाहिली. पण त्यात ती अपयशी ठरली. जिद्दीला पेटलेल्या शन्नो बेगमने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पुन्हा एकदा अभ्यासाला सुरूवात केली. तिने दहावीची परीक्षा तर पास केलीच, पण दिल्लीसारख्या महिलांसाठी अत्यंत असुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरामधली ‘उबर’ची पहिली महिला ड्रायव्हर म्हणूनही व्यवसाय तिने सुरू केला
वाचा- बांग्लादेशची ‘क्रेझी आंटी’
या सगळ्या प्रक्रियेत अर्थातच तिला तिच्या सासूपासून अनेकांनी विरोध केला. ‘ही पुरूषांची कामं आहेत’, ‘तू धुणीभांडीच कर’ वगेैरे टोमणे तिला सहन करावे लागले. पण आता तिचं यश पाहून हेच सगळेजण तिची प्रशंसाही करत आहेत.
पत्रकार शिरीन भान यांनी शन्नो बेगमवरचा हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.
सौजन्य- शिरीन भान, फेसबुक
सगळ्या अडचणींवर मात करत खडतर परिस्थितीतू मार्ग काढणाऱ्या शन्नो बेगमना सलाम!