शाळा म्हटले की वह्या-पुस्तके, शिक्षकांनी घेतलेले तास आणि खूप सारा अभ्यास. त्यामुळे शाळेचे नाव काढले की गणित, इतिहास, विज्ञान, भाषा यांचे तासच लहानग्यांना सर्वात आधी आठवतात. अभ्यास न आवडणाऱ्या मुलांना तर यामुळे शाळेतच जायचे नसते. अनेक मुले शाळेत गेल्यापासून मधल्या सुटीचीच वाट पाहतात. मग कधी एकदा डबा खातो आणि खेळायला जातो असे त्यांना झालेले असते. मात्र जपानमधील शाळा याला अपवाद आहेत. याठिकाणी पारंपरिक शिक्षणाचे धडे देत असतानाच जेवण कसे करावे हे शिकविणारा एक खास तास विद्यार्थ्यांसाठी असतो.

आता जेवायला काय शिकवायचे? ते तर आपण आपल्या घरीही शिकतोच की असे आपल्याला वाटेल. मात्र सार्वजनिक ठिकाणी सामूहिक जेवण करताना आपण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या टाळाव्यात हे सांगितले जाते. हा अभ्यासाप्रमाणेच एक शिक्षणाचा तास असतो आणि शिक्षक विद्यार्थ्यांना या मधल्या सुटीत सर्व गोष्टी अतिशय आत्मीयतेने एखाद्या विषयाचा धडा शिकवावा तसे शिकवत असतात. यासाठी मुलांना घरुन काही उपकरणे आणणे गरजेचे असते. जपानमध्ये जवळपास सर्वच शाळांमध्ये दुपारचे जेवण शाळेतूनच मिळते.

जेवण करण्याचे हे औपचारिक शिक्षण मुले अतिशय आवडीने घेतात आणि लहान वयात शिकलेल्या या गोष्टी आयुष्यभरासाठी उपयोगात येतात. यामध्ये विद्यार्थ्यांना वाढण्याचे, खाण्याचे आणि खाल्ल्यानंतर योग्य पद्धतीने साफसफाई करण्याचे तसेच दात घासण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. शालेय मुलांना खानापानाचे शिक्षण देणारा जपान शालेय शिक्षणाच्या दृष्टीने एक आदर्श आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Story img Loader