Wedding Viral Video: तुळशीच्या लग्नानंतर जवळपास मार्च पर्यंत लग्नसराईचा शुभ काळ सुरु असतो. तुमच्याकडेही नात्यागोत्यातील, मित्र मंडळींमधील अनेकांच्या लग्नपत्रिका आल्या असतील ना.. अलीकडे दर वीकएंडला कोणाचे ना कोणाचे लग्न होत आहे. सोशल मीडियावरही लग्नाच्या फोटोंनी अनेकांचं फीड भरून गेलं आहे. आता इतकी लग्न होत असल्याने आपल्या लग्नाची चर्चा व्हावी म्हणून प्रत्येकजण काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये फक्त नवरा नवरी नव्हे तर त्यांचं कुटुंब, मित्र सगळे आपापल्या परीने योगदान देत असतात. पण अलीकडे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या लग्नाच्या गडबडीत भटजी बुवांची भाषाच जास्त भाव खाऊन गेली आहे.
इंस्टाग्राम वर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका लग्नाची मंगलाष्टके सुरु आहेत. आता मंगलाष्टकांमध्ये काय वेगळं व्हायरल होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण यात लग्न लावणारे गुरुजी चक्क इंग्रजीतून मंगलाष्टके गात आहेत. जिग्नेश माळी या इंस्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून याला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तब्बल २५ हजारहून अधिक व्ह्यूज, लाईक्स व कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करणारा जिग्नेश हा स्वतः एक वेडिंग फोटोग्राफर असल्याचे समजत आहे. एका जोडप्याच्या लग्नात त्याने गुरुजींचा इंग्लिश मंगलाष्टकांचा व्हिडीओ शूट केला होता.
दरम्यान, यापूर्वी एक दाक्षिणात्य गुरुजी इंग्रजी भाषेत सत्यनारायणाची कथा सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र आता व्हायरल होणारा व्हिडीओ हा महाराष्ट्रातील एका मराठमोळ्या जोडप्याच्या लग्नातील असल्याचे दिसत आहे.
इंग्रजी मंगलाष्टके
अनेकांनी या गुरुजींच्या इंग्रजीचं कौतुक केलं आहे मात्र काहींनी निदान तुम्ही तरी आपल्या संस्कृतीचा मान ठेवा असे म्हणत टीका केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.