छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असणारा आदर आणि प्रेम महाराष्ट्रीयांमध्येच नाही तर देशभरातील नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या कर्तृत्त्वाला वंदन करण्यासाठी अनेक जण आपापल्या परिने प्रयत्न करत असतात. मुंबईतील एका तरुणाने अशाचप्रकारे एका अनोख्या कलाकृतीद्वारे महाराजांना वंदन केले आहे. जवळपास बहुमजली इमारतीइतका आकार असलेली ही कलाकृती खऱ्या अर्थाने भव्यदिव्य आहे. या कलाकृतीचे लिम्का बुक आणि गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.
चेतन राऊत या पवई येथे राहणाऱ्या आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्टसचा माजी विद्यार्थी असलेल्या तरुणाने शिवाजी महाराजांची ११० बाय ९० फुटांची कलाकृती साकारली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे वापरात नसलेल्या ७५ हजार सीडींच्या माध्यमातून त्याने हे मोझॅक सीडी पोट्रेट तयार केले आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत चेतनने आपल्या या उपक्रमाची सुरुवात केली. नुकतेच हे चित्र तयार झाले आहे. विक्रोळी येथील धर्मवीर संभाजीराजे मैदानात ही कलाकृती सादर करण्यात आली आहे.
याबाबत सांगताना चेतन म्हणाला, किमान ५ जागतिक विक्रम करण्याचे माझे स्वप्न आहे. यातील हा दुसरा प्रयत्न आहे. याआधी टेपरेकॉर्डच्या कॅसेटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १७ बाय २० फूटांची कलाकृती साकारली होती. आताच्या शिवाजी महाराजांच्या चित्रात एकूण २६ रंगछटा वापरल्या असून त्यासाठी जमिनीवर कोणतेही मार्कींग करण्यात आलेले नाही. यासाठी साधारण साडेचार लाख खर्च आला आहे.
हे चित्र बनविण्यासाठी १५ जणांनी मदत केली असून प्रदिप सावंत आणि रुद्रेश मेश्राम या जे.जे च्या माजी विद्यार्थ्यांनी तर रोहीत पवार या आता शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने मदत केली असल्याचे चेतनने सांगितले. टाकाऊ वस्तूंपासूनही जागतिक विक्रम होऊ शकतो हा संदेश द्यायचा असल्याचेही तो म्हणाला. हे चित्र पाहण्यासाठी मुंबईमधील नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
सायली जोशी
sayali.patwardhan@indianexpress.com