अजगरबिजगर म्हटलं की छान वगैरे बिलकुल वाटत नाही. एकवेळ नाग किंवा विषारी सापाएवढी भीती वाटणार नाही पण “कित्ती गोड तो अजगर!” असं वाक्य कोणाच्या तोंडून आलेलं आपण सहसा एेकत नाही. आनंद, हसू, चैतन्य वगैरे कोणत्याही भावनांचं अजगर प्रतीक नाही.

तर मूळ मुद्दा असा की अजगराचा आणि चांगल्या भावनांचा दूरदूरवर संबंध नसताना ‘स्माईली’ अजगर वगैरे म्हटलं की कुछ हजम नही होता. पण वरच्या फोटोत दाखवलेल्या अजगराच्या त्वचेवर खरोखरचे स्माईलीज् आहेत.

आता हा किंवा याच्यासारखा प्रकार भारतात घडला असता तर ‘दैवी अजगर’ वगैरे म्हणून त्याचं बाजारीकरण लगेच झालं असतं. पण त्या अजगराच्या सुदैवाने त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला.

या अजगराच्या मालकाचं नाव आहे जस्टिन कोबाएल्का. आपण त्याला जस्टिन म्हणूयात. आणि या अजगराच्या प्रजातीचं नाव आहे ‘लव्हेंडर अल्बिनो पायबाॅल्ड बाॅल पायथाॅन’. आपण त्याला ‘स्माईली अजगर’ म्हणूयात.

तर हा स्माईली अजगर ‘ब्रीड’ करायला जस्टिनला आठ वर्ष लागली. प्राणिशास्त्रज्ञांना आणि शेतकऱ्यांना हे ‘ब्रीडिंग’ प्रकरण किती गुंतागुतीचं आहे याची कल्पना असेल.

जनावराची योग्य जात मिळवणं आणि त्याहीपुढे जात एक नवीच जात विकसित करायला प्रचंड मेहनत लागते. यासाठी जेनेटिक क्षेत्रातल्या ज्ञानासोबत पारंपरिक ज्ञान असणंही आवश्यक असतं. असं सगळं करूनही एक विशिष्ट जात मिळेलच याची खात्री नसते. आणि त्यातही एखादा त्वचेचा रंग मिळवणं हेसुध्दा कठीण असतं. इथे तर या अजगराच्या कातडीवर तीन स्माईली आहेत!

जस्टिनने त्याच्या प्रयोगांची सुरूवात केली तेव्हा त्याने त्वचेवर स्माईली असणारा अजगर विकसित करायचा याच एका उद्देशाने काम सुरू केलं. तो सर्पप्रेमी आहे. अनेक प्रयोग करून पाहिल्यावर आपलं काम त्याने चिकाटीने सुरू ठेवलं आणि हा स्माईली अजगर जन्माला आला. अशा प्रकारचे स्माईली असणारा जगातला हा एकमेव अजगर आहे. पहा हा व्हिडिओ

सौजन्य- बिझनेस इनसायडर

Story img Loader