आपल्याला कधीकधी कामांची इतकी घाई असते की त्या नादात आपण कुठेही आपली दुचाकी पार्क करतो आणि कामासाठी निघूनही जातो. मात्र असे करणे धोक्याचे ठरु शकते. कधी लहान गल्ल्यांमध्ये तर कधी बाजारात अशाप्रकारे अतिशय गर्दीत आणि चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क केलेल्या आपल्याला दिसतात. पण यामुळे इतरांना अडचण होईल याचा आपण जराही विचार करत नाही.

इतकेच नाही तर घाईत दुचाकी पार्क करताना आपण आजूबाजूच्या गोष्टींचा अंदाज घेत नाही आणि अपघात घडण्याची शक्यता असते. या व्हिडिओमध्येही अशीच एक दुर्घटना घडल्याचे आपल्याला दिसेल. अनेकदा दुकानांच्या समोर आपण कोणताही विचार न करता गाडी पार्क करतो. कर्नाटक पोलिसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकताच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी तुमच्या गाड्या सुरक्षितपणे पार्क करा असेही म्हटले आहे.

यामध्ये एक व्यक्ती आपली गाडी अतिशय कमी जागेत लावायचा प्रयत्न करत असल्याचे दिसतो. अशापद्धतीने गाडी लावत असताना या व्यक्तीचा तोल जातो आणि ही व्यक्ती खाली असलेल्या रस्त्यावर पडते. आता हा रस्ता तो व्यक्ती गाडी लावत असलेल्या ठिकाणापासून बराच खाली असल्याचेही आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. ३० सेकंदांच्या या व्हिडिओमधून व्यक्ती गाडी लावण्यासाठी कसा झटतो आणि एकाएकी कसा खाली पडतो हे आपल्याला सहज दिसू शकते.

हा व्यक्ती खाली पडल्यानंतर रस्त्यावरील लोक त्याच्या मदतीसाठी धावून येतात. त्याला फारसे लागत नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने गाडी लावण्याचा प्रयत्न तुम्हाला महागात पडू शकतो हे आपल्याला या व्हिडिओमधून दिसते. या व्हिडिओला नेटिझन्सनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या असून बऱ्याचजणांनी काळजी घ्यायला हवी असे म्हटले आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली ही घटना सोशल मीडियावर वेगाने पसरली आणि एकमेकांना काळजी घ्यायला सांगत ती व्हायरलही झाली.

Story img Loader