Maharashtrian Bride Ukhana Video: इकडची स्वारी, अहो, अमुकचे बाबा, अशा नावांनी आधी आपल्या नवऱ्याला हाक मारायची पद्धत होती. अलीकडे लग्नाआधीच्या भेटीगाठी आणि मैत्रीमुळे सहसा अनेक मुली नवरोबांना नावानेच हाक मारतात. पण एक अशी संधी असते जेव्हा मात्र अगदी लाजत, मुरडत, आपल्या अहोंचं नाव घेतलं जातं. अर्थात ही संधी म्हणजे लग्न. आता एप्रिल- मे दरम्यान पुन्हा लग्नसराईला सुरुवात होईल. अशावेळी तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कुणाला मस्त उखाणा तयार हवा असल्यास आज आपण पाहणार असलेला व्हिडीओ तुमच्या कामी येईल. या नव्या नवरीने गृहप्रवेशाच्या वेळी घेतलेला लांबलचक मजेशीर उखाणा नेटकऱ्यांच्या सुद्धा पसंतीस उतरत आहे. @shrunkhala_Naik_Vlogs च्या शृंखला नाईकने आपल्याच लग्नातील हा क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी नवरीचा उखाणा (Maharashtrian Bride Ukhana Video)

खरंतर उखाणा असतो दोन ओळींचा पण संधी चालून आलीये तर होईन म्हणते व्यक्त
निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे..
नाव घेते शृंखला लक्ष द्या सारे..
नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी ‘अहो’च म्हणायचं..
अत्रावळी वर पत्रावळी
पत्रावळी वर भात
भातावर वरण, वरणावर तूप
तुपाहूनही सुंदर आमचं रूप
रूपाहुनही सुंदर आहे आमचा जोडा
सागररावांचं नाव घेते..
नणंदबाई आतातरी आमची वाट सोडा..

हा उखाणा व्हायरल झाल्यापासून याला ८ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. २६ हजाराहून अधिक लाईक्स असलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून नवरीबाईच्या उखाण्याचे कौतुक केले आहे. तुमच्याही ओळखीत कुणाचं ‘यंदा कर्तव्य असेल’ आणि त्यांचा सुद्धा उखाण्यांचा अभ्यास चालू असेल तर हा व्हिडीओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.