Metro Runs Under River: कोलकाता मेट्रो ही भारतातली सर्वात जुनी मेट्रो ट्रेन सेवा आहे. बुधवारी (१२ एप्रिल) या मेट्रो ट्रेन हुगळी नदीच्या खालून धावत इतिहास रचला. या निमित्ताने भारतात पहिल्यांदा मेट्रो ट्रेनने नदीखालून प्रवास केला. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रेड्डी यांनी रेक क्रमांक MR-612 मध्ये बसून एस्प्लेनेड ते हावडा मैदान स्थानकापर्यंत प्रवास केला. सकाळी ११.५५ वाजता मेट्रो ट्रेन हुगली नदीखाली तयार करण्यात आलेल्या बोगद्यातून धावली.
एकूण व्यवस्था पाहण्यासाठी घटनास्थळी मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रेड्डी यांच्यासह अतिरिक्त महाव्यवस्थापक, मेट्रो रेल्वे आणि कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRCL) व्यवस्थापकीय संचालक एच. एन. जयस्वाल आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मेट्रोच्या कोचजवळ पोहचल्यावर उदय कुमार यांनी हावडा स्टेशनवर पूजा केली. त्यानंतर कोच नंबर MR -613 देखील हावडा स्टेशनपर्यंत पोहचवण्यात आला. पुढे महाव्यवस्थापक या नात्याने उदय कुमार यांनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, ही आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक घटना आहे. हावडा मैदान ते एस्प्लेनेड या विभागात नियमित सेवा सुरू होण्यापूर्वी पुढील सात महिने या मार्गाची पूर्ण चाचणी केली जाईल. या विक्रमाची माहिती मेट्रोच्या अधिकृत सोशल मीडिया साइट्सद्वारे लोकांना देण्यात आली.
पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो ट्रेन
या दोन स्थानकांदरम्यान ४.८ किमी भूमिगत मेट्रोचा ट्रायल रन सुरु होणार आहे. एका ते दीड वर्षात ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मेट्रोचे हे काम पूर्ण झाल्यावर हावडा मैदान रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक बनेल. हे स्थानक जमिनीपासून ३३ मीटर खाली असणार आहे असे म्हटले जात आहे. मेट्रोने हुगळी नदीखालील ५२० मीटर अंतर ४५ सेकंदात पार करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला बोगदा हुगळी नदीच्या पात्राच्या ३२ मीटर खाली आहे.