Mumbai Local Man Caught Under Train Rescue Video: “हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी.. ” या गाण्यातील प्रत्येक ओळ जर तुम्हाला खरोखरच अनुभवायची असेल तर मुंबईत एकदा तरी राहून बघावंच. एरवी तुम्ही मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होणारी भांडणे अनेकदा सोशल मीडियावर पाहता पण आज जीवाला जीव देणारा मुंबईकर पाहायची संधी आम्ही घेऊन आलो आहोत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मुंबईकरांच्या एकीचं बळ दिसून आलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता उपनगरीय लोकल ट्रेनच्या चाकाखाली अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सहप्रवाशांनी अक्षरशः पराक्रम केला आहे. सदर घटना वाशी येथे घडली असून आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. ४१ -सेकंदाच्या क्लिपमध्ये लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनजवळ जमलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. लोक ज्याप्रकारे धावती ट्रेन पकडण्यासाठी उभे असतात त्या प्रमाणेच आता ट्रेनच्या बाहेर रांगेत उभे आहेत. ट्रेनला एका बाजूने लागलेली ही रांग ट्रेनचा डब्बा ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.
रेडइट वर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमधील प्राथमिक माहितीनुसार एक जण रूळ ओलांडताना ट्रेनखाली अडकला होता. पनवेलला जाणाऱ्या या ट्रेनच्या खाली माणूस अडकल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. इतक्या हातांनी धक्का देत ट्रेनचा डब्बा थोडा वर उचलला गेला आणि मग ही व्यक्ती सुखरूप बाहेर आली असेही पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांना फूट ओव्हर ब्रिज वापरण्याचे आवाहन केले आहे. साहजिकच या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत मुंबईकरांच्या एकीचे कौतुक केले आहे. “आम्ही चौथ्या सीटसाठी भांड भांड भांडू पण उद्या वेळ आली तर जीवाची बाजी लावू हीच मुंबईकरांची ओळख आहे”. “हे तुम्हाला फक्त मुंबईतच पाहायला मिळू शकतं.” “जो तुम्हाला चार शिव्या देऊनही तुमच्या मूर्खपणात साथ देईल तोच खरा मुंबईकर” असे म्हणत अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.