वय हा केवळ आकडा आहे, हे नुकतेच एका ५८ वर्षांच्या आजीबाईंनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. २१ मार्च २०२४ रोजी कॅनडामधील ५८ वर्षांच्या महिलेने तब्बल साडेचार तास एकाच आसनामध्ये राहून आपले नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविले आहे. यासंबंधीचा व्हिडीओ गिनीज बुकच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कोण आहे ही महिला आणि तिने कोणते आसन केले आहे ते पाहू.
गिनीज बुकमध्ये नाव नोंदविणाऱ्या या महिलेचे नाव डोना जीन वाइल्ड असून, ती कॅनडाची रहिवासी आहे. डोना यांनी २१ मार्च २०२४ रोजी अॅबडॉमिनल प्लँक हे आसन सलग चार तास ३० मिनिटे व ११ सेकंदांसाठी करून नवा विश्वविक्रम केला आहे.
डोना अनेक वर्षे शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. निवृत्तीआधी त्यांनी उपमुख्याध्यापक म्हणूनही काम केले होते. साधारण १२ वर्षांपूर्वी डोना यांचा हात मोडल्यानंतर त्यांनी प्लँक करण्यास सुरुवात केली. आठवडाभराच्या सरावाने डोना यांनी त्यांच्या प्लँक करण्याच्या वेळेमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार त्यांनी रोजच्या व्यायामादरम्यान करण्यास सुरुवात केली होती. आता डोना दररोज तीन तास किंवा त्याहून अधिक वेळ प्लँक आसन करतात. त्यांच्या गिनीज विक्रमाच्या वेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या १२ नातवंडांसह सर्व कुटुंबदेखील आले होते.
“आता माझी कोपरं खूप दुखत आहेत. मी धरून ठेवलेली शरीराची ठेवण सुटेल की काय, अशी भीती मला त्यावेळी होती आणि शेवटचा एक तास हा माझ्यासाठी खूप अवघड झाला होता. तेव्हा माझं सर्व लक्ष माझं शरीर आणि मी केलेल्या आसनाकडे होतं”, असं डोना यांनी गिनीज बुकला माहिती देताना सांगितले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यावर नेटकऱ्यांची त्यावर काय प्रतिक्रिया आहे पाहा.
“बापरे, ३० सेकंद झाले तरी माझं शरीर माझी साथ सोडून देतं”, असे एकाने लिहिले.
“डोना जीन वाइल्ड!!! ही माझी संगीत शिक्षिका आहे…” असे दुसऱ्याने लिहिले.
“काय! याला म्हणतात विश्वविक्रम… खूपच भन्नाट” असे तिसऱ्याने लिहिले.
इन्स्टाग्रामवरील @guinnessworldrecords अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २.४ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.