Pune Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख सांगतात. या शहरातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिर, गडकिल्ले अतिशय लोकप्रिय आहे. हजारो लोक दर दिवशी पुणे दर्शनाला येतात आणि येथील वास्तु व लोकप्रिय ठिकाणांना भेट देतात पण फक्त पुणे शहरात नाही तर पुण्याजवळ सुद्धा अनेक असे ठिकाणे आहेत ज्याविषयी लोकांना माहिती नाही. आज आपण अशा एका सुंदर ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या ठिकाणाविषयी माहिती सांगितली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला उंच टेकडीवर वसलेले एक सुंदर मंदिर दिसेल. जे पांढऱ्या काळ्या दगडात कोरलेले आहे. मंदिराचे सौंदर्य व आजुबाजूचे निसर्गरम्य वातावरण पाहून तुम्हालाही या ठिकाणी भेट द्यावीशी वाटेल. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून हे मंदिर खूप भव्य आहे. या मंदिराचे नाव भूलेश्वर मंदिर असून येथे सुंदर शिवलिंग आहे. मंदिराच्या भिंतीवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुण्यापासून फक्त ५० किमीवर आहे. पुणे सोलापूर हायवेला यवत गावातून या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या ठिकाणी एकदा भेट द्यावीशी वाटेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sahyadri.putra_shlok या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासून फक्त ५० किमी अंतरावर असलेले १२०० वर्षे जुन्या भुलेश्वर मंदिराला पांडवांच्या काळापासूनचा समृद्ध इतिहास लाभलेला आहे. १३ व्या शतकातील हे मंदिर पूर्वी मंगळगड किल्ला म्हणून बांधले गेले होते पण नंतर ते भगवान शिव यांना समर्पित एका मंदिरात रूपांतरित झाले. कोरीवकामांनी केलेल्या रेखीव कामामुळे येथील भिंती भक्ती आणि कारागिरीची साक्ष देतात. त्याच्या स्थापत्य वैभवापलीकडे, भुलेश्वरला खोलवर पौराणिक महत्त्व आहे. एक आख्यायिका अशी आहे की देवी पार्वतीने येथे भगवान शिवासाठी नृत्य केले आणि याच ठिकाणाहून ते लग्न करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम व्हिडिओ ” तर एका युजरने लिहिलेय, “ड्रोन पायलटचे खूप कौतुक करावेसे वाटते.खूप छान पद्धतीने व्हिडीओ शूट केला आहे.” अनेक युजर्सनी या मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.