बंगळुरूमध्ये मोबाईल अॅपद्वारे रिक्षा बुक करणाऱ्या एका व्यक्तीला रिक्षा चालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पीडित व्यक्तीने स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. बंगळुरूमधील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रिक्षा ड्रायव्हरने मारहाण केलेल्या व्यक्तीचं नाव अनिश असं आहे. अनिशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याला रिक्षा ड्रायव्हर मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनिश आणि रिक्षा चालकामध्ये काही वेळ वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान हा वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाने अनिशला मारहाण केल्याचंही दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे रिक्षा चालकाने रस्त्यावरून चालताना व्यक्तीला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. अनिशने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत पोलिसांनी रिक्षा चालकावर कारवाई करावी असं आवाहनदेखील केलं आहे.

हेही पाहा- व्हिलचेअर मिळेना म्हणून संतापलेला व्यक्ती स्कुटी घेऊन थेट हॉस्पिटलमध्येच शिरला! पुढे काय घडलं ते जाणून घ्या

अनिशने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ही घटना बंगळुरूच्या लोकांसाठी खूप सामान्य आहे. तुम्ही ओला किंवा उबेर बुक करतो आणि तिथे पोहोचताच ड्रायव्हर राइड कॅन्सल करायला सांगतात आणि ड्रायव्हर ऑफलाइन जाण्यास सांगतात. शिवाय तुम्ही ते सांगतात तसं केलं नाही तर ते मारहाण करतात. यावर कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान, बंगळुरू पोलिसांनी या घटनेची दखल घेत पीडित व्यक्तीला आरोपीबद्दलची अधिक माहिती देण्याचे आवाहन केले आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अशा रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

Story img Loader