Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती अतिशय लोकप्रिय आहे. शिक्षणाचं माहेरघर आणि आयटी हब असलेल्या पुण्यात दरवर्षी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आणि तरुणमंडळी नोकरीसाठी येतात. काही लोक येथेच स्थायिक होतात. दिवसेंदिवस पुण्याची लोकसंख्या वाढत आहे. जलद शहरीकरण झाल्याने आणि खाजगी वाहने वाढत असल्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनलेली आहे. पुण्यात दरदिवशी कुठे ना कुठे भयंकर वाहतूक कोंडी दिसून येते. अनेकदा याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुणेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर संताप व्यक्त करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एका चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असताना झोमॅटो डिलिव्हरी बॉय वाहतूक सुरळीत करताना दिसून आला. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पुण्यातील मुंढवा चौकात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अशावेळी त्याच रस्त्याने जाणारा झोमॅटो डिलिव्हरी बॉय मदतीला धावून आला. त्याने त्याची दुचाकी चौकात लावून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. तो वाहन चालकांना सुचना देत वाहतूक सुरळीत करताना दिसून आला. या डिलिव्हरी बॉयचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारासचा हा व्हिडीओ आहे.
सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी त्यांची संघर्षमय कहाणी दिसून येते तर कधी काही, पण या व्हिडीओने सर्वांचे मन जिंकले आहे. स्वत:चं काम बाजूला ठेवून हा सुजाण नागरिक म्हणून मदतीला धावून आला.
पुण्यातील वाहतूक कोंडी
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका एकत्रित काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी शहरातील नगर रस्ता, सोलापूर रस्त्यांवर विविध उपाययोजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला. त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांचा देखील आढावा घेऊन वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या.
प्रमुख रस्त्यांवरील कोंडी होण्याची कारणे वाहतूक पोलिसांनी शोधली आहेत. यांमध्ये काही वेळा अचानक वाहने रस्त्यावर आल्याने कोंडी होते; तसेच काही वेळा नागरिकांच्या चुका, रस्त्यात वाहन बंद पडणे, चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसणे यांमुळे कोंडीत भर पडत असल्याचे लक्षात आले.