Auto Rickshaw In California Viral Video : भारतामध्ये अजूनही कितीतरी लोक दररोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. इतर देशांतही बस, रेल्वे, मेट्रो, टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध असतात. मात्र, आपल्या देशातील तीन चाकी म्हणजेच रिक्षा ही पाश्चिमात्य देशांत कुठेही नजरेस पडत नाही… किंवा पडत नव्हती. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत एक रिक्षा थेट अमेरिकेत पोहोचली असल्याचे दृश्य पाहायला मिळते.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शहरातील रस्त्यांवर चक्क एक ऑटोरिक्षा थाटात फिरत असल्याचे दृश्य इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. manoharsrawat नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. व्हिडीओ शेअर करताना, ‘कॅलिफोर्नियात ऑटोरिक्षा #artesia.’ अशी कॅप्शन त्यााला दिलेली आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर स्वच्छ रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे असल्याचे पाहायला मिळते.
तसेच, पादचारी मार्गावरून एक स्त्री बाबागाडीदेखील नेत आहे. अशात एक पिवळ्या आणि काळ्या रंगाची रिक्षा इतर चार चाकी गाड्यांसह रस्त्यावर धावत असल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. या व्हिडीओला ‘दिवाना है देखो’ हे हिंदी गाणेदेखील जोडण्यात आले आहे.
भारतातील खाद्यपदार्थांपासून ते भारतीय वेशभूषा, मेकअप, संस्कृती, व्यायाम पद्धती यांबद्दल पाश्चिमात्य देशांमध्ये कौतुक आणि आकर्षण असल्याचे समाजमाध्यमांवरून आपल्याला सतत पाहायला मिळते. मात्र, आता भारतातील तीन चाकी रिक्षा अमेरिकेत पोहोचल्यावर नेटकऱ्यांची त्यावर काय मते आहेत ते पाहू.
“अमेरिकेत अशा सेवेची खरंच गरज आहे,” असे एकाने लिहिले.
“वाह! आता अमेरिका भारतासारखी बनू लागली आहे,” असे दुसऱ्याने लिहिले.
“वाह! मुंबईची रिक्षा थेट अमेरिकेला पोचली…,” असे तिसऱ्याने लिहिले.
“अमेरिकेला अमेरिकाच राहू द्या.. दिल्ली नका बनवू,” असे चौथ्याने लिहिलेय.
“या रिक्षाला परवानगी कशी मिळाली,” असा प्रश्न पाचव्याने केला आहे.
व्हिडिओ पाहा :
काही वापरकर्ते अमेरिकेत रिक्षा पाहून खुश आणि आश्चर्यचकित झाले होते; तर काहींना मात्र हा प्रकार मुळीच पसंत पडला नसून, त्यांनी कमेंट्समध्ये आपली नाराजी दर्शविल्याचे दिसते.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @manoharsrawat या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत ९८३K इतके व्ह्युज; तर २६.५K लाइक्स आणि २८९ कमेंट्स आलेल्या आहेत.