पाळीव कुत्र्याला दररोज बाहेर फिरायला घेऊन जाताना, सर्व कुत्री अगदी मजा मस्ती करत, खेळत नुसते फिरत असतात. मात्र, सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून @finn_and_stefen या अकाउंटने एक अत्यंत गोंडस व्हिडीओ शेअर केला होता. फिन हे त्या पाळीव कुत्र्याचे नाव आहे, तर स्टेफन हे त्याच्या मालकाचे. स्टेफनने त्या व्हिडीओमधून त्याच्या कुत्र्याची एक अतिशय भन्नाट आणि आगळीवेगळी सवय किंवा छंद सांगितला आहे. त्यानुसार फिनला बाहेर फिरायला घेऊन गेल्यानंतर रस्त्यावर पडलेले रिकामे कॅन, बाटल्या यांसारख्या वस्तू गोळा करायला आवडतात. मात्र, या आवडीचा स्टेफनने त्याच्या कुत्र्यासाठी अत्यंत सुंदर असा फायदा करून घेतला आहे.
व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे, फिन सर्व कचरा [कॅन आणि बाटल्या] गोळा करतो आणि त्याचा मालक ते सर्व घरामध्ये जमा करून ठेवतो, नंतर ते रिसायकलिंगसाठी देण्यात येतात. रिसायकलिंगला दिलेल्या कचऱ्याच्या बदल्यात त्यांना थोडे पैसे मिळतात. हेच पैसे स्टेफन रस्त्यावरील प्राण्यांना मदत करणाऱ्या संस्थेला देणार आहे असे म्हणतो.
हेही वाचा : पाळीव कुत्र्याने केला चक्क ३ लाखांचा नाश्ता!! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहा…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशा या भन्नाट आणि गोड व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. काय म्हणत आहे नेटकरी पाहा.
“पर्यावरणाची रक्षा करणारा फिन” असे एकाने लिहिले आहे. “आम्ही गोल्फ [खेळाचा एक प्रकार] कोर्सच्या जवळ राहतो. आमच्याही पाळीव कुत्र्याला असे गोल्फचे चेंडू जमा करायला भरपूर आवडतात. त्यामुळे आता घरात असंख्य चेंडू जमा झाले आहेत” असे दुसऱ्याने त्याच्या कुत्र्याच्या सवयीबद्दल लिहिले आहे. तिसऱ्याने, “चला एकातरी पाळीव कुत्र्याला घरभाडं भरण्याची जाणीव आहे, मीसुद्धा माझ्या कुत्र्याला असं काहीतरी शिकवण्याचा विचार करतोय”, अशी मिश्कील प्रतिक्रिया तिसऱ्याने लिहिली आहे. चौथ्याने, “पण लोकं अशा रिकाम्या बाटल्या आणि कॅन रस्त्यावर फेकून जातात हे जरा चुकीचे आहे” म्हटले आहे.
शेवटी पाचव्याने, “इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ” असे लिहिले आहे.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या गोंडस व्हिडीओला आतापर्यंत ६२९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.