चुरमुरे, कांदा, टोमॅटो, मिरची, मसाले, कोथिंबीर, शेव आणि थोडासा लिंबाचा रस, असे सर्व पदार्थ भराभर एकत्र करून आपल्याला समोरासमोर दोन मिनिटांच्या आत चटपटीत अशी भेळ बनवून मिळते. समुद्रकिनारी सूर्यास्त बघत ही भेळ खाणं म्हणजे अगदी सुख असतं. अर्थात, यामध्ये ओली भेळ, फरसाण किंवा मटकी भेळ, असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे या पदार्थाची चटपटीत अशी चव.
मात्र, सध्या सोशल मीडियावर सुरतमधील मिळणाऱ्या एका भन्नाट ‘गोड’ भेळेचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @sanskarkhemani या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक महिला एका वॉफल [पाश्चिमात्य गोड पदार्थ] मेकरमध्ये चॉकलेट आणि रेड वेल्वेट फ्लेवरचे पीठ घालून वॉफल बनवून घेते. मग एका फॉइलच्या बाऊलमध्ये तयार केलेल्या वॉफलचे कात्रीने तुकडे करून घालते. त्यावर डार्क चॉकलेटपासून व्हाइट चॉकलेटपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेटचे सॉस घालते. नंतर त्यावर क्रीम बिस्किटांचे तुकडे, किसलेले चॉकलेट, चॉकलेट चिप्स व रंगीत स्प्रिंकलर्स घालून ही वॉफल भेळ तयार करते. असे आपण पाहू शकतो.
हेही वाचा : Viral video : स्वयंपाकघरात उंदरांचा सुळसुळाट! चक्क परातीमधून पळवून नेली कणिक; व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा….
या व्हिडीओला कॅप्शनदेखील ‘सुरतमधील वॉफल भेळ’, अशी दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच नेटकऱ्यांनी त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत.
“नशीब भेळ म्हणून यावर शेव नाही घातली,” असे एकाने लिहिले आहे. “त्यामध्ये चुरमुरे, शेव, हिरवी चटणी, चीज, गोड चटणी मेयॉनीज व कोथिंबीर घालायची राहिली आहे,” अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्याने “अरे, यावर थोडी साखर आणि मध घालायला विसरली आहे,” असे म्हटले आहे. चौथ्याने, “हे खाल्ल्यावर मधुमेह झालाच म्हणून समजा,” असे लिहिले आहे. तर शेवटी पाचव्याने, “मागची व्यक्ती हात हलवून हे घेऊ नका, असे सांगत आहे,” अशी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे.
@sanskarkhemani या अकाउंटवरून शेअर झालेल्या वॉफल भेळेच्या व्हिडीओला आजपर्यंत २६ मिलियन इतके व्ह्युज आणि ५१३ K लाइक्स मिळाले आहेत.