गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक भन्नाट अशा विक्रमांची नोंद केली आहे. त्यामध्ये लोकांना अन्नपदार्थांच्या विश्वविक्रमाबद्दल सर्वांत जास्त आकर्षण असते. मध्यंतरी दोन मुलांनी मिळून जगातील सर्वांत मोठे चीज सॅण्डविच बनवून विक्रम रचला होता. परंतु, आता एका व्यक्तीने चक्क एक लिटर टोमॅटो सॉस एका दमात पिऊन नवा विक्रम केल्याचे समोर आले आहे.
आंद्रे ऑर्टोल्फ [Andre Ortolf] असे गिनीज विक्रम करणाऱ्या इसमाचे नाव असून, त्याने ५५.२१ सेकंदांमध्ये एक लिटर टोमॅटो सॉस पिऊन दाखवला आहे. हे ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी अगदीच सोपे वाटत असेल; मात्र असा विक्रम करणे वाटते त्याहून अवघड असते. आतापर्यंतची ही सॉस पिण्याची सर्वाधिक जलद गती आहे, अशी माहिती गिनीज बुकच्या अधिकृत इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केल्या गेलेल्या व्हिडीओमधून मिळते.
हेही वाचा : बापरे! जगातील सर्वांत मोठे सँडविच जवळपास १९० किलोचे! पाहा थेट गिनीज बुकात झाली नोंद….
व्हिडीओमध्ये आंद्रेने काचेच्या पारदर्शक अशा एका मोठ्या जगमध्ये एक लिटर सॉस ओतून घेतलेला आहे. वेळ सुरू करताच त्याने सॉसमध्ये ठेवलेल्या स्ट्रॉच्या साह्याने हा विक्रम केला आहे. व्हिडीओमध्ये आंद्रे एकदाही थांबला नाही किंवा एकदाही त्याने आपले डोके वर करून पाहिले नाही. सॉस पिण्यास सुरुवात केल्यावर जगमधील शेवटचा थेंब संपेपर्यंत एका दमात आंद्रेने तो टोमॅटो सॉस संपवला आहे. शेवटी आंद्रे आपले दोन्ही हात बाजूला करीत, जीभ दाखवून आपण हा नवीन विक्रम केल्याबद्दल आनंद व्यक्त करून दाखवतो.
गंमत म्हणजे आंद्रेचा हा एकमेव विक्रम नसून, त्याच्या नावावर अजूनही बरेच विक्रम आहेत. त्यातील काही सांगायचे म्हणजे, एका मिनिटात चॉप स्टिक्सच्या मदतीने सर्वाधिक जेली खाणे, एका मिनिटात सर्वाधिक दही खाणे, ३० सेकंदांमध्ये सर्वाधिक सूप पिणे यांसारखे कितीतरी प्रकारचे विक्रम त्याने करून दाखवले आहेत.
जर्मनीच्या आंद्रे ऑर्टोल्फ याला जुने विक्रम मोडून नवे विक्रम रचायला फार आवडते. त्यात त्याला भरपूर आनंद मिळतो, असे त्याने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये लिहिले आहे.
याआधी काही महिन्यांपूर्वी दोन मुलांनी जगातील सर्वांत मोठे ग्रिल्ड चीज सॅण्डविच बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली जागा तयार केली होती. हे सॅण्डविच जवळपास १९० किलोचे होते; जे ६.२ फूट रुंद, ३.३२ फूट लांब व २.७ इंच जाडीचे होते.