शाळा, कॉलेजच्या शिक्षणासाठी अनेक पालक त्यांच्या मुलांना हॉस्टेलवर ठेवतात. तर काही आपल्या मर्जीने शिक्षण पूर्ण करेपर्यंत हॉस्टेलचा पर्याय निवडतात. अर्थात हॉस्टेलमध्ये राहताना अनेक भन्नाट किस्से घडत असता, मजामस्ती सुरु असते. मात्र तिथे राहणे हे वाटते तितके सोपे मुळीच नसते. त्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हॉस्टेल आणि तेथील जेवण.
अनेकजण हॉस्टेलवर मिळणारे जेवण चांगल्या चवीचे किंवा चांगल्या दर्जाचे नसल्याची तक्रार करत असतात. जेवणाबद्दल अशीच मार्मिक पद्धतीने तक्रार करतानाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील chaitan.chatz नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये हॉस्टेलमध्ये मिळणारी पोळी कशी आहे ते दाखवले आहे.
तर व्हिडीओमध्ये एका स्टीलच्या ताटात भात, भाजी वाढून घेतलेले दिसते. त्या ताटामधील पोळी हातात घेऊन, “गरिबांनो, ही पोळी नाही टॅको [पाश्चिमात्य पदार्थ] आहे, टॅको.” असे म्हणत व्हिडीओ शूट करणारी तरुणी, पोळी ताटामध्ये आपटून म्हणते. पोळी ताटामध्ये आपटत असताना, त्याचा होणारा आवाज ऐकूनच ती किती कडक आणि जाड आहे याचा अंदाज येऊ शकतो.
“ही दिसतेय पोळीसारखी पण, कृपया याला पोळी समजण्याची चूक करू नका. हे सालसा किंवा सॅलड ड्रेसिंग बरोबर खायचं असत. ही पोळी नाही मेक्सिकन टॅको आहे!” असे म्हणून आपला व्हिडीओ संपवते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच तुफान व्हायरल झालेला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत, त्या पाहू.
“कोणत्या मेक्सिको जेलमध्ये राहतेस?” असे एकाने विचारले आहे.
“आमच्या हॉस्टेलमध्ये याहून कडक मिळतात..” असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“पाण्यात बिजवून ठेवायची स्टेप राहून गेलीये..” असे तिसऱ्याने म्हंटले.
“पोळी राहूदे, ती भाजी कशी दिसते…” असे चौथ्याने म्हंटले.
“माझ्याकडे हातोडी आहे…” असे पाचव्याने लिहिले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @chaitan.chatz या अकाउंटने शेअर केलेल्या आणि व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आत्तापर्यंत एकूण २ मिलियन इतके व्ह्यूजमिळाले आहेत.