गरमागरम सांबार, खोबऱ्याची चटणी आणि त्याच्यासोबत खाल्ला जाणारा कुरकुरीत असा मस्त डोसा म्हणजे, सुख असते. दक्षिण भारतीय पदार्थ न आवडणारी क्वचितच कुणी व्यक्ती असेल. तसेच पोटभर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीमला नाही म्हणणारेही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असतील. मात्र डोसा आणि आईस्क्रीम बद्दल का सांगितले जात आहे? याला एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे सोशल मीडियावर फिरणारा आईस्क्रीम डोसा!
होय अगदी बरोबर वाचलं आहेत तुम्ही. सोशल मीडियावर अनेक चित्रविचित्र पदार्थ बनवल्याचे व्हिडीओ आपण दररोज पाहत असतो. आता अशात अजून या आईस्क्रीम डोश्याची भर पडली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @foodb_unk नावाच्या अकाउंटने या पदार्थाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा : एका ‘लिपस्टिकने’ केले चिमुकलीचे रडणे सेकंदात गायब! व्हायरल Video पाहून पोट धरून हसाल!
या व्हिडीओमध्ये, सुरवातीला अगदी नेहमी आपण डोसे बनवतो त्याप्रमाणे तव्यावर डोश्याचे पीठ पसरवून एक पातळ डोसा बनवून घेतला आहे. आता त्यावर थोडे बटर लावून, टूटीफ्रूटी, रंगीत स्प्रिंकल्स घातले. सर्वात शेवटी चक्क व्हॅनिला आईस्क्रीमचा मोठा गोळा डोश्यावर ठेऊन त्यावर चेरीने आणि चॉकलेट सिरपने सजावट केल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.
इंटरनेटवर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांचे विचित्र फूड कॉम्बिनेशनवर काय मत आहे ते पाहू.
“असे पदार्थ बनवणाऱ्यांसाठी नरकात राखीव जागा आहे.” अशी एकाने प्रतिक्रिया व्हिडीओ खाली लिहिली आहे. दुसऱ्याने, “कृपया याला डोसा म्हणू नका.. याला पॅनकेक म्हणू शकता.” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “कोण खातात हे असले पदार्थ?” असा प्रश्न केला आहे. चौथ्याने, “भाव थोडे हार्पिक घालायचे राहून गेले आहे.” शेवटी पाचव्याने, “अरे मग आईस्क्रीमवर थोडे सांबार पण घालायचे ना…” असे म्हंटले आहे.
हेही वाचा : पारंपरिक पद्धतीने पापड कसे बनवतात माहित आहे? खाण्याआधी विचार कराल; Video पाहा
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @foodb_unk नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या आईस्क्रीम डोश्याला आत्तापर्यंत २८६K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.