या कडाक्याच्या थंडीत आपण घरी मोठ्या आरामात चादर घेऊन थंडीचा आनंद घेत आहोत. उत्तर भारतात आता बर्फ पडताना आपण पाहतो. आपण इथे बसून त्याचे व्हिडीओ पाहत जर आपण तिथे असतो तर किती मस्त वाटलं असतं, तिथे किती सुंदर वातावरण आहे, असं म्हणतो. पण अशा परिस्थितीत तिथल्या स्थायिक लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावेळी देखील तिथल्या एका कुटुंबाला अशाच एका अडचणीचा सामना करावा लागला होता. पण त्यांच्या मदतीसाठी बर्फाच्या वादळांची तमा न बाळगता लष्कराचे जवान त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर जम्मु आणि काश्मिरच्या बोनियार येथील घागर हिल गावातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गावातील एका गरोदर महिलेला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती. त्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सला संपर्क साधला. यावेळी त्या जवानांनी त्या महिलेला जोरदार बर्फवृष्टीमध्ये स्ट्रेचरवर ६.५ किलोमीटर लांब असलेल्या सालासनपर्यंत नेले आणि त्या महिलेला रुग्णालयात पोहोचवले. दरम्यान, त्या महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे. हा व्हिडीओ चिनार कॉर्प्स- इंडियन आर्मी या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या आधीही लष्करातील जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी जवानांची बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते, जे बर्फाच्या वादळातही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. या व्हिडीओमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असताना भारतीय लष्कराचे जवान नियंत्रण रेषेवर (LoC) गस्त घालताना दिसत आहेत.