सध्या अनेक जण आहारातील साखरेचा वापर टाळण्यासाठी त्याला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. गुळामध्ये गोडव्याबरोबर अनेक पोषक घटक असतात, म्हणूनच चहामध्ये म्हणा किंवा साखर घालून बनवलेल्या गोड पदार्थांना पर्याय म्हणून आपण शरीराला पोषण देणाऱ्या आणि आरोग्यदायी गुळाचा वापर करतो.
असे असले तरी अनेकदा गुळामध्ये आपल्याला काही अनावश्यक घटक उदा. मुंग्या, कचरा प्लास्टिकचे कण इत्यादी गोष्टी आढळतात. गूळ बनवण्याची प्रक्रिया हे अशा गोष्टी आढळण्याचे कारण असू शकते. गूळ हा अनेक कामगारांच्या हातून तयार होत असतो. तो नेमका कसा बनतो याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @foodiesfab_india या अकाउंटने शेअर केला आहे.
हेही वाचा : तुम्हीही चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून पित आहात? मग पाहा, हे गुळाच्या चहाचे पाच आरोग्यदायी फायदे…
व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार सुरुवातीला ऊसाच्या चरख्यामध्ये ऊस घालून, एका अत्यंत घाणेरड्या पाईपमधून सगळा रस कढईत गोळा करून घेतला आहे. नंतर तो रस उकळून त्यावर आलेल्या काळ्या रंगाचा थर कापडामध्ये काढून गाळून घेतला. आता उकळणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रसामध्ये तेल किंवा त्यासारखा कुठलातरी पदार्थ आणि खायचा रंग घालून गुळाचे मिश्रण शिजवले जात आहे. तयार मिश्रण जमिनीवरच तयार केलेल्या चौकोनी खड्ड्यात थंड करण्यासाठी ओतला आणि गूळ गार झाल्यानंतर हाताने त्याची ढेप बनवून एका लाकडी पेटीमध्ये भरून घेतलेले आपण पाहू शकतो.
या सर्व प्रक्रियेदरम्यान तो चरखा, रस गोळा करणारी कढई, पाईप इत्यादी सर्व वस्तू अत्यंत अस्वच्छ आणि घाणीने रापलेल्या होत्या. इतकेच नाही, तर ऊसाचा रस ज्या पाईपमधून येत होता त्यालाच भांडे लावून एका मुलाने तो पिऊन दाखवला आहे. हा सर्व प्रकार पाहून नेटकऱ्यांनी मात्र व्हिडीओमध्ये दिसणारी अस्वच्छता आणि अत्यंत किळसवाण्या प्रकारे हाताळला जाणारा गूळ यांवर प्रचंड प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
हेही वाचा : दररोजच्या वापरातल्या गुळाची ‘शुद्धता’ कशी तपासावी? पाहा, तुमची मदत करतील ‘या’ सात टिप्स…
“हा व्हिडीओ बघताना कितीतरी वेळा मला उमासे आले” असे एकाने लिहिले. दुसऱ्याने, “हे खाण्यासाठी बनवलं जातंय?” असे विचारले. “इतक्या कमी पगारातदेखील हे कामगार किती कष्टाने काम करतात, त्यांचे खरंच कौतुक आहे”, असे तिसऱ्याने लिहिले. चौथ्याने, “चांगल्या आणि स्वच्छ उत्पादनांसाठी त्या कामगारांना पैसे वाढवून द्या” असे सुचवले आहे. तर शेवटी पाचव्याने, “माझ्या आजोबांनी अशाच पद्धतीने बनवलेला गूळ खाल्लेला आहे. त्यांचं वय ९३ वर्ष असून एकही आजार त्यांच्या मागे नाहीये. त्यांना चष्मा लावायला लागत नाही. इतकेच नाही तर अजूनही ते मैलभर अंतर सहज चालू शकतात, असे लिहिले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हिडीओला आत्तापर्यंत ११.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.