‘ए कुल्फी…’ खणखणीत आवाजातले हे दोन शब्द आपल्या कानावर पडले की, ऊन वा उकाड्यामुळे त्रासलेल्या जीवात अचानक उत्साह येतो आणि कुल्फी विकणाऱ्या माणसाच्या आवाजाकडे आपण आपोआप खेचले जातो. त्या कुल्फीवाल्याच्या डोक्यावरील बर्फ़ाने भरलेल्या भल्यामोठ्या टोपलीमध्ये मलाई कुल्फी, केशर-पिस्ता अशा काही निवडक चवींची कुल्फी आपल्याला मिळायची. मात्र, सध्या साधारण पांढरा सदरा-पायजमा आणि डोक्यावर लाल कापडात गुंडाळलेली कुल्फीची टोपली घेऊन फिरणारा ‘कुल्फीवाला’ अगदी क्वचितच पाहायला मिळतो.
मात्र, ही काडीला लावून मिळणारी आणि मोठ्या प्रमाणात विकली जाणारी कुल्फी कशी बनते हे तुम्ही कधी पाहिले आहे का? सोशल मीडियावर सध्या याच काडीवरची किंवा मटका कुल्फी बनवितानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @foodie_incarnate नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, कुल्फीचा हा व्हिडीओ नक्कीच तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देईल.
कुल्फी बनवितानाचा हा व्हिडीओ काही लहान व्हिडीओ क्लिप्स जोडून बनविलेला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती गोल बुडाच्या एका भल्यामोठ्या पातेल्यात बर्फ घालून पातेले जोरजोरात हलवून घेते. पुढे एका मोठ्या कढईत दूध उकळून घेते. आता दुसऱ्या कढईत उकळत असलेल्या पाण्यात एक पातेले ठेवून, त्यामध्ये कुल्फीचे मिश्रण तयार केले जात आहे. नंतर तयार झालेल्या कुल्फीचे मिश्रण कुल्फीच्या साच्यात घालून, तो गृहस्थ त्यावर घट्ट झाकण बसवतो.
आता हे कुल्फीचे साचे पुन्हा त्या गोल बुडाच्या मोठ्या पातेल्यात घालतो. त्यामध्ये भरपूर बर्फ आणि मीठ घालून, ते पातेले हलवून घेतो आणि त्याच्यातच कुल्फी थंड करायला ठेवून देतो. कुल्फी बनविणारा गृहस्थ तयार झालेली कुल्फी साच्यासकट एका गोणीमध्ये भरून, त्याच्या दुकानावर घेऊन जातो. आता कुल्फीचा साचा उघडून, त्यामध्ये चार काड्या खुपसतो आणि सुरीने कुल्फीचे चार तुकडे करून खाण्यासाठी देतो. असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
व्हायरल होणाऱ्या आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या व्हिडीओवर नेटकरी काय म्हणतात पाहू.
“उन्हाळ्यात हमखास खाल्ली जाणारी कुल्फी!” अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. “लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या”, असे दुसऱ्याने लिहिले. “सगळ्यात भारी आहे हे..” असे तिसऱ्याने लिहिले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २.१ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.