लग्नाची वरात म्हटलं की डान्स आलाच. नागिण डान्स, पतंग उडवणे यांसारख्या डान्स स्टेप्स आपण अनेक वरातींमध्ये पाहिल्याच आहेत. त्या स्टेप्स इतक्या लोकप्रिय आहेत की त्याशिवाय लग्नाच्या वरातीला मजाच येत नाही. या डान्सच्या स्टेप्स प्रसिद्ध आहेतच. पण त्यात आता आणखी एका डान्सची भर पडणार आहे. ‘पहिया डान्स’ असे या प्रकाराचे नाव आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर हा डान्स सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओत लोकांचा घोळका दिसतो. त्यामध्ये एक व्यक्ती डान्स करत आहे. त्याच्या हातात सायकलच्या दोन चाकांच्या रिम आहेत. एक डोक्यावर फिरवून दुसरी कमरेवर ठेवून समतोल साधत तो ठुमके लगावताना दिसत आहे. त्याच्या ही ‘करामत’ पाहून घोळक्यातील लोक त्याचे कौतुक करत आहेत. गाण्यांच्या तालावर डान्स करत एकाहून एक सरस स्टेप करणारी ही व्यक्ती प्रोफेशनल दिसते. त्याच्या ड्रेसकोडवरून हे लक्षात येते. पांढरा शर्ट, लाल टाय, क्रीम कलरची फॉर्मल पॅंट आणि फॉर्मल शूज असा त्याचा पेहराव आहे. त्याच्या ठुमक्यांवर फिदा होऊन अनेक जण त्याला पैसेही देताना या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडीओ कोणी, कुठे रेकॉर्ड केला आणि नाचणाऱी व्यक्ती कोण आहे, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.