भारतीय पदार्थ आणि त्याचे चाहते आता जगभरात सगळीकडे असल्याचे आपण अनेक समाजमाध्यमांच्या मदतीने पाहू शकतो. अनेक परदेशी नागरिक अगदी आवडीने आणि भारतीय पदार्थांचे कौतुक करून खात असल्याचे, तसेच एखाद्या पदार्थाची रेसिपी शिकून ती स्वतः तयार करीत असल्याचे व्हिडीओ आपण अनेकदा पाहतो.
मात्र, त्याचबरोबर समाजमाध्यमावर ‘फूड फ्युजन’चेसुद्धा अनेक व्हिडीओ आपल्या सतत बघण्यात येत असतात. त्यातील काही पदार्थ दिसण्यासाठी तरी खरोखर सुंदर असतात. मात्र, काही पदार्थ हे केवळ वाटेल त्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळून, त्याला काहीतरी विचित्र नाव देऊन तयार केले जातात. अशा पदार्थांचे व्हायरल व्हिडीओ नक्कीच अनेकांनी पाहिले असतील. त्यामध्ये ओरिओ आम्लेट, चॉकलेट चीज वडापाव, डोसा आइस्क्रीम असे अनेक पदार्थ आहेत. मात्र, सध्या या यादीत अजून एका पदार्थाने जागा मिळवली आहे. तो पदार्थ म्हणजे ‘गुलाबजाम मिल्क शेक’!
खरे तर हा मिल्क शेक अतिशय साध्या पद्धतीने कोणत्याही विचित्र गोष्टी एकत्र न करता, बनविण्यात आला आहे. तरीही हे पेय इंटरनेटवर चांगलेच ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे तयार केलेल्या एक ग्लास गुलाबजाम मिल्क शेकमध्ये असलेले साखरेचे प्रमाण. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील lifeofdpk नावाच्या अकाउंटने हा गुलाबजाम मिल्क शेकचा व्हिडीओ शेअर केला आहे. नेमके त्याने तो कसा बनवला आहे ते पाहू.
प्रथम lifeofdpk ने एका मिक्सरच्या भांड्यात गुलाबजामचा पाक घालून घेतला. नंतर त्यामध्ये त्याने दोन गुलाबजाम घालून, पुन्हा त्यावर साखरेचा पाक घातला. पुढे, त्या मिक्सरच्या भांड्यात तीन चमचे आईस्क्रीम, दूध व बर्फ घालून सर्व गोष्टी मिक्सरला फिरवून घेतल्या. शेवटी एका ग्लासमध्ये गुलाबजामच्या पाकाने सजावट करून, त्यामध्ये तयार केलेला मिल्क शेक ओतून घेतला. त्यावर व्हीप क्रीम घालून, पुन्हा एक चमचाभर गुलाबजामचा पाक ओतला आणि गुलाबजामचा एक तुकडा त्या व्हीप क्रीममध्ये ठेवला. अशा पद्धतीने lifeofdpk ने हा गुलाबजाम मिल्क शेक बनविला आहे. या पदार्थावर नेटकरी काय म्हणतात ते पाहू.
“अरे, तुला तुझे घरचे ओरडत नाहीत का रे,” असा एकाने प्रश्न केला आहे.
“हा मधुमेह होण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे!” असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“हा मिल्क शेक स्वर्गसुख देणारा आहे. कारण- हे पिणारी व्यक्ती थेट तिथेच पोहोचेल.” अशी प्रतिक्रिया तिसऱ्याने दिली आहे.
” अरेच्चा, थोडी साखर घालायची बाकी राहिली,” असे चौथ्याने म्हटले.
“जे याला डायबिटिक मिल्क शेक म्हणत आहेत, ते विसरलेत की मोठ्या क्रीमवाल्या कॉफीमध्येही इतकीच साखर असते.” असे पाचव्याने लिहिले आहे.
हा ‘गुलाबजाम मिल्क शेक’ पाहून तुम्हाला काय वाटले? तुम्हाला हा पदार्थ प्यायला आवडेल का? इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @lifeofdpk नावाच्या अकाउंटद्वारे शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ७९०K इतके व्ह्युज मिळाले आहेत.