लहान मुलांना रडण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे असते. एखादे खेळणे सापडत नसेल, हट्ट पुरवला जात नसेल किंवा त्यांच्या मनासारखे काही झाले नाही की ही चिमुकली मुलं टप्पोऱ्या डोळ्यांमध्ये पाणी आणून भोकाड पसरतात. त्यांचे ते निरागस, पाण्याने डबडबलेले डोळे आणि लहान झालेला चेहरा पाहून समोरची व्यक्तीही त्या गोंडस मुलांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, या चिमुरड्यांचे हट्ट नेहमी पुरवले जातातच असे नाही. काही हुशार पालक या मुलांना शांत करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात. अशाच एका रडणाऱ्या चिमुकलीला शांत करण्यासाठी, एका आईने वापरलेल्या भन्नाट युक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या आईने रडणाऱ्या मुलीला अक्षरशः एका सेकंदात शांत केले आहे. आता हे तिने नेमके कसे केले ते पाहू.

हेही वाचा : आईला सरप्राइज म्हणून बनवायचा होता भात; मात्र किचनची अवस्था पाहून तरुणालाही रडू आवरेना, Video पाहा

व्हिडीओमध्ये सोनेरी रंगाचे बुट्टे असलेला गडद रंगाचा फ्रॉक घातलेली एक गोड चिमुकली आपल्याला दिसते. तिने केसांच्या छान दोन शेंड्या बांधलेल्या आहेत आणि कपाळावर छोटी टिकली लावलेली आहे. अशी अगदी गोंडस दिसणारी ही मुलगी कोणत्या तरी कारणाने आपले नकटे नाक उडवत मोठमोठ्याने रडत आहे असे दिसते. त्यावर तिच्या आईने त्या चिमुकलीच्या ओठांवर बोटाने लिपस्टिक लावल्यासारखे करते आणि “रडू नको बेटा आता, लिपस्टिक लावली ना; रडू नको, नाहीतर लिपस्टिक निघून जाईल” असे म्हणते.

हे ऐकल्याबरोबर त्या मुलीचे रडणे एकदम गायब होते. आपल्या ओठांवर लावलेली लिपस्टिक निघून जाऊ नये यासाठी मुलीने अगदी एका सेकंदामध्ये आपले रडणे थांबवले आणि अगदी गोड हसून, बोट ओठांकडे नेत “हे बघ” असे म्हणत आहे. मुलीचे रडणे थांबलेले पाहून महिलेने तिला पटकन डोळे आणि नाक पुसून घ्यायला सांगितले. तसे लगेच आईने दिलेला रुमाल घेऊन त्या चिमुकलीने झटपट तोंड स्वच्छ केले आणि पुन्हा हसून आपली लिपस्टिक दाखवते.

हेही वाचा : पारंपरिक पद्धतीने पापड कसे बनवतात माहित आहे? खाण्याआधी विचार कराल; Video पाहा

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @angel__shivali नावाच्या अकाउंटने हा अत्यंत गोंडस व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या पाहू.

“बरं झालं ही आयडिया दिली, आता मी पण माझ्या मुलीवर ती वापरून पाहीन”, असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “बाळाची आई खूपच हुशार आहे”, असे आईचे कौतुक केले आहे. तिसऱ्याने, “आता लहान मुलगा असेल तर त्यासाठीही टिप्स द्या” असे म्हटले आहे. चौथ्याने, “लहानपणापासूनच या मुली नौटंकी करण्यात पटाईत असतात”, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे; तर शेवटी पाचव्याने, “माझी मुलगी एवढी हुशार आहे की ती पहिले आरशात जाऊन मी खरंच लिपस्टिक लावली की नाही ते बघेल आणि नसेल लावली तर अजून मोठमोठ्याने रडून गोंधळ घालेल” असे लिहिले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर आतापर्यंत त्याला ९.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of mom tricked her daughter with a lipstick to stop crying went viral on social media netizen says smart mother dha
Show comments