भट्टीतून काढलेला गरमागरम कुलचा म्हणजे केवळ उत्तर भारतीयांचाच नव्हे, तर प्रत्येक खाद्यप्रेमी व्यक्तीचा जीव की प्राण आहे. खास करून दिल्लीसारख्या ठिकाणी, वरून थोडा कुरकुरीत मात्र आतून मऊ लुसलुशीत असा विविध प्रकारचे सारण घालून बनवलेल्या कुलच्यांची बात काही औरच आहे. अशाच एका खास प्रकारच्या कुलच्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @foodelhi नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, कुलचामध्ये चिकन निहारीचे सारण घालून बनवले गेल्याचे समजते. हा व्हिडीओ शेअर होताच तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या पदार्थाला प्रचंड पसंती दिली असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. परंतु, व्हिडीओमध्ये एवढे वेगळे काय आहे ते पाहा.
हेही वाचा : ‘हा’ पदार्थ वापरून बनवा ‘कोकणी व्हेज फिश करी’! काय आहे याची भन्नाट अशी रेसिपी अन् प्रमाण पाहा…
या फूड ब्लॉगरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चिकन निहारी घालून बनवलेला तंदुरी कुलचा पाहायला मिळेल. मंद आचेवर मसाले आणि कोथिंबीर घालून शिजवलेले चिकन, जाडसर कुलाचामध्ये घालून त्याला भट्टीत खमंग होईपर्यंत भाजले आहे. त्याबरोबरच खाण्यासाठी एक लाल रंगाची चटणी/ग्रेव्ही आणि बटर दिलेले आहे. हा कुलचा जाड असला तरीही त्याचे पापुद्रे सुटून कुलच्याच्या प्रत्येक भागामध्ये चिकन घातल्याचे दिसते. असा हा जबरदस्त चिकन निहारी तंदूर कुलचा, नवी दिल्लीच्या वसंत कुंजमध्ये ४२५ रुपयांना मिळत असल्याची माहिती या व्हिडीओखाली दिलेल्या कॅप्शनमधून समजते.
हा व्हिडीओ पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याचे आपल्याला व्हिडीओखाली दिलेल्या प्रतिक्रियांमधून समजते.
एका युजरने, “हे पाहूनच मला खूप भूक लागली आहे” असे लिहिले आहे. दुसऱ्याने, “तो कुलचा अगदी तोंडात विरघळेल असा दिसतोय” असे म्हटले. काहींनी, “यामध्ये चिकनऐवजी पनीर टाकून मिळते का?”, “जे मांस खात नाहीत, त्यांच्यासाठी काही पर्याय आहे का?” असे प्रश्न केले आहेत. तर तिसऱ्याने, “निहारी कुलचा हा लखनऊचा पदार्थ आहे आणि हे त्याचे वेगवगळे प्रकार आहेत. उगाच असे पदार्थ दाखवून पारंपरिक पदार्थांची वाट लावू नका”, अशी माहिती दिली आहे.”
निहारी कुलचा हा खरंच लखनऊचा पदार्थ असून, मंद आचेवर मटण वगैरे मांसाहारी गोष्टी, मसालेदार रश्श्यामध्ये [stew] शिजवले जातात, ज्याला निहारी म्हटले जाते. ही निहारी कुलच्यासोबत खायला दिली जाते. मंद आचेवर पदार्थ शिजवल्याने सर्व पदार्थांची चव वाढण्यास मदत होते, अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.
@foodelhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओला आतापर्यंत ३.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.