भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची मुलगी झिवा यांचे व्हिडियो कायम चर्चेचा विषय ठरतात. झिवाचे गोड फोटो आणि व्हिडीओ धोनी सोशल मीडियावर पोस्ट करतो न करतो तोच ते व्हायरलही होतात. जगभरात धोनीचे असणारे अगणित चाहते आता झिवाचेही चाहते झाले आहेत. आपल्या लाडक्या बाबांसाठी मैदानात पाण्याची बाटली घेऊन धावत जाणारी झिवा, कॅप्टन कूलसोबत लाडू फस्त करणारी झिवा, पोळ्या लाटणारी झिवा, दोन भाषेत आपल्या बाबाला कसे आहात विचारणारी झिवा… असे तिचे भरपूर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेतच. त्यात आता झिवा आणि धोनीचा आणखी व्हिडीओ धोनीने पोस्ट केला आहे. या इन्स्टाग्राम व्हिडियोमध्ये धोनी आणि चिमुकली झिवा हे दोघेही समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या रेतीत खेळताना दिसत आहेत.
धोनीने रेतीत एक खड्डा केला आहे. त्यामध्ये त्याने झिवाला उभे केले आणि पुन्हा त्या खड्ड्यात रेती भरली. यामुळे झिवाचे पाय रेतीत अडकले. धोनी करत असलेल्या सगळ्या गोष्टींचा झिवा आनंद घेत असल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे. हा व्हिडियो धोनीची बायको साक्षी हिने काढला असून काळ्या रंगाच्या टॉपमध्ये झिवा अतिशय गोंडस दिसत आहे. हा व्हिडियो जवळपास १८ लाख जणांनी पाहिला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आम्हाला जेव्हाही रेती मिळते तेव्हा आमचा हा प्रयोग ठरलेला असतो असेही धोनीने हा व्हिडियो पोस्ट करताना म्हटले आहे. यात आणखीही एक व्हिडियो आहे, ज्यात झिवा या रेतीतून बाहेर येताना दिसत आहे. त्यानंतर ती रेतीत हाताने अतिशय मनापासून खेळत असल्याचेही या व्हिडियोमध्ये दिसते. त्यामुळे एकूणच झिवा सतत चर्चेत असल्याचे आपल्याला दिसते.