पाकिस्तानचा हुकूमशहा, लष्करावर जबर पकड असणारा माजी लष्करप्रमुख, पाकिस्तानचा स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष म्हणून सात वर्ष सत्ता उपभोगणारा आणि सत्ता सोडायची वेळ आल्यावरही आपल्या पसंतीच्या माणसांकडे लष्कराची सूत्रं सोपवणारा सत्ताधीश अशा लांबलचक आणि भीतीदायक बिरूदावल्या घेऊन फिरणारे जनरल परवेझ मुशर्रफ म्हणजे पाकिस्तानच्या आणि आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळांमध्ये एक मोठं नाव असणारं प्रस्थ. जवळपास दशकभर पाकिस्तानवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मुशर्रफ यांचीच पकड होती. सत्तेवरून पायउतार झाल्यावर राजकारण्यांचे ग्रह फिरतात. पण मुशर्रफ यांच्याबाबतीत तसंही काही झालं नाही. पाकिस्तानबाहेर का होईना पण ते सुरक्षित आणि तुलनेने मुक्त आयुष्य जगत होते.

पण त्यांच्या जिवालाही धोका होताच. त्यांनीच आश्रय दिलेले अनेक दहशतवादी गट आणि त्यांचे ‘खूंखार’ म्होरके या ना त्या कारणाने मुशर्रफना संपवायला टपले होते. मुशर्रफ यांच्यावर अनेक जीवघेणे हल्ले करण्यात आले पण त्या सगळ्यातून चतुराईने मुशर्रफ बचावले.

पण आता प्रसंग बाका होता. मुशर्रफ यांच्या जिवावर उठलेले दहशतवादी त्यांच्या एवढे जवळ पोचले की त्यांना आपल्या वकिलांमार्फत इस्लामाबाद कोर्टात सुरक्षेची मागणी करावी लागली. जो देश आपण आठ वर्ष सांभाळला त्याच देशात राहण्यासाठी एका अध्यक्षाला संरक्षणाची मागणी करावी लागावी? छे छे छे! आम्हाला संरक्षण द्या मिलाॅर्ड म्हणत मुशर्रफ यांच्या वकिलांनी न्यायमूर्तींची १३ जानेवारीला करूणा भाकली!

आणि तेवढ्यात हा व्हिडिओ आला.

सौजन्य- यूट्यूब

या व्हिडिओत दहशतवाद्यांपासूनच्या बचावासाठी जनरल परवेझ मुशर्रफनी एका अंधाऱ्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं होतं. त्यांना मारायला येणाऱ्या दहशतवाद्यांना ते स्पष्टपणे दिसू नयेत म्हणून तिथले लाईट्स मध्येच बंद वगैरे केले जात होते. ते त्यांच्या सहकाऱ्यांशी जी काही चर्चा करत होते ती चर्चा बाहेर एेकू जाऊ नये म्हणून मोठ्ठ्या आवाजात ‘दिल्लीवाली गर्लंफ्रेंड छोड छाड के’ लावलं होतं. शेवटी भिंतीलाही कान असतात ना!

हा व्हिडिओ नेटवर आल्यावर आपले लाडके नेते सुखरूप आहेत ना याची खातरजमा करण्यासाठी लाखोंनी या व्हिडिओवर उड्या टाकल्या आणि उगाचच तो व्हायरल झाला.

पाकिस्तानमधले आघाडीचे पत्रकार हामिद मीर यांनीसुध्दा फाळणीआधी त्यांचं कुटुंब भारतात राहत असल्याच्या थाटात मुशर्रफना पाठीचं वगैरे दुखणं असेल असं सांगत ‘नको नको हो बदनामी’ असं खवचटपणे सुचवलं.

बाकी नेटिझन्सनी मुशर्रफना वयानुसार सांधेदुखी झाली असेल म्हणून झाल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करायची सगळ्यांना विनंती केली. फक्त थोड्याथोडक्यांनी मुशर्रफ यांचं हे वागणं माजी लष्करप्रमुखाला शोभणारं नाही वगैरे बोअर प्रतिक्रिया दिल्या.

बाकी भारतीय सिनेमे आणि गाण्यांवर पाकिस्तानमध्ये बऱ्याच वेळा बंदी असते. पण पाकिस्तानचाच माजी अध्यक्ष ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड छाड के’ वर नाचताना पाहून हाफिझ सईद, मसूद अझर वगैरे समाजसेवकांनी अजूनतरी प्रतिक्रिया दिल्याचं एेकिवात नाही.

बाय द वे, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा जन्म १९४३ साली दिल्लीमध्येच झाला होता.

Story img Loader