Viral Video: निवडणूक म्हटलं की हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप हे होत असतात. इतकेच नाही तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दोन पक्षांमधील वादात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतानादेखील दिसतात. खरंतर अशावेळी कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखणे गरजेचे असते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. केरळमध्ये स्थानिक सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर दोन गटातील वाद एका चांगल्या कामासाठी काही क्षण थांबवल्याचे उदाहरण समोर आले आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही गटांनी त्यांच्यातील तुंबळ हाणामारी काही वेळासाठी थांबवून, एका रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. हाणामारी सुरू असतानादेखील त्यांनी राखलेलं हे सामाजिक भान चर्चेचा विषय ठरत आहे.
केरळच्या कालिकत जिल्ह्यातील स्थानिक सहकारी बँकेच्या निवडणुकी दरम्यान हा प्रकार घडला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या गटाचे काही कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.
नेमकं काय झालं?
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या बंडखोर गटाने सीपीआय(एम)च्या पाठिंब्याने बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जिंकली. यानंतर या दोन्ही गटात वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. गेल्या ६१ वर्षांपासून या मंडळावर काँग्रेसची पकड होती.
दरम्यान काँग्रेस आणि सीपीआय(एम) पक्षाचे समर्थक आपआपसात भिडले असताना रस्त्यावरून एक रुग्णवाहिका जात होती. या रुग्णवाहिकेला वाट देण्यासाठी हाणामारी जागच्या जागी थांबवण्यात आली. यासाठी दोन्ही गटांनी आपापसातील वैर काही वेळासाठी बाजूला केले आणि रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी दोन्ही गट पुढे सरसावल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सिद्धार्थ नावाच्या एका एक्स यूजरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने सांगितलं की, “आज, सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून माझ्या घराजवळील मुख्य रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्ते (INC) आणि काँग्रेस बंडखोर (CPIM समर्थित) यांच्यात हाणामारी झाली. अचानक, एक रुग्णवाहिका तेथे आली आणि दोन्ही बाजूंनी ताबडतोब हाणामारी थांबवली, रुग्णवाहिकेसाठी वाट करून दिली. नंतर लगेच परत हाणामारीला सुरूवात केली. द रियल केरला स्टोरी”.
हेही वाचा >> “जबाबदारी अशी गोष्ट आहे की…”, ट्रक चालकाचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील
या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ही रुग्णवाहिका गर्दीतून वाट काढत पुढे गेल्याबरोबर जराही वेळ न घालविता पुन्हा दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाली. हा व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तुफान व्हायरल होत असून लोक मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत.
एका वापरकर्त्याने “विचार करा जर हे उत्तर प्रदेशात झालं तर” असे म्हटले आहे. तर दुसर्या एका वापरकर्त्याने “शिक्षणाची शक्ती” अशी कमेंट केली आहे. तर एकाने पुढच्या वेळी हाणामारी सुरू असताना आपण त्या ठिकाणी रुग्णवाहिका पाठविण्याचा विचार केला पाहिजे अशी टिप्पणी देखील केली.