राजघराण्यातील व्यक्ती नेहमीच सामान्य जनतेसमोर येताना मोठ्या अदबीनं वागतात. राजघराण्याची शिस्त, मूल्य जपतात. त्या नेहमीच आब राखून बोलतात. पण राजघराणं असो किंवा सामान्य जनता असो म्हणतात ना घरोघरी मातीच्या चूली. तसाच काहीसा प्रकार नुकताच स्पेनच्या राजघराण्याबाबतीतही समोर आला आहे. राजघराण्यातील सासू- सुनेतले खटके कॅमेरात कैद झाले आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्पेनच्या मॉलोर्का बेटावर इस्टरनिमित्त स्पेनचं राजघराणं जमलं होतं. यावेळी स्पेन राजघराण्याची राणी सोफिया आणि त्यांची सून राणी लेतिझियाही आपल्या दोन मुलींसोबत आली होती. ७९ वर्षांच्या राणी सोफिया आपल्या दोन्ही नातींसोबत फोटो काढण्यात व्यग्र होत्या. ही बाब राणी लेतिझिया यांच्या लक्षात येताच त्यांनी फोटोग्राफर आणि या तिघींच्या वारंवार मध्ये येण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर जवळ जात सासू सोफिया यांचा हात आपल्या मुलींच्या खांद्यावरून झटकण्याचा प्रयत्नही केला. हा सारा प्रकार उपस्थितांच्या नजरेतून सुटला नाही तर नवलंच. अखेर राणी सोफिया यांचे सुपुत्र राजे फिलिप्स यांनी मध्ये पडून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. आपल्या पत्नीला आणि आईला शांत करण्याचा प्रयत्न करणारी त्यांची केविलवाणी मुद्राही कॅमेरात कैद झाली आहे.

वाचा : विमलताईंची ‘धवलक्रांती’तून ‘अर्थक्रांती’, महिन्याला कमावतात १५ लाख!

आपण जनतेसमोर आहे याचं भान राखत सासू सूनेचं भांडण अखेर तात्पुरता शमलं. जणू काही सारं आलबेल आहे अशा अविर्भावत या राजघराण्यातील सदस्यांनी संपूर्ण कुटुंबाचे छान फोटोही काढून घेतले. पण, या व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी राणी लेतिझिया यांनी आपल्या सासूला दिलेल्या वागणूकीवर आक्षेप घेतला आहे. पण राणी लेतिझिया यांच्या जवळच्या मैत्रिणीने मात्र या प्रसंगाविषयी माध्यमांशी बोलताना लेतिझिया यांची बाजू मांडली आहे. हे फोटोग्राफर्स कोण होते? त्यांना कोणी बोलावलं? आपल्या मुलींचे फोटो कुठे छापण्यात येतील? यांसारख्या अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. या फोटोंचा गैरवापर होऊ नये म्हणूनच त्या फोटोग्राफर्सच्या मध्ये आल्या. ही एका आईची प्रतिक्रिया होती असं त्यांच्या मैत्रिणींचं म्हणणं होतं.

वाचा : वडिलांच्या जिद्दीला सलाम ! तब्बल २४ वर्षांनी शोधलं हरवलेल्या मुलीला

Story img Loader