कधी बाळाच्या खोलीत तर कधी अंथरुणात साप शिरल्याच्या काही बातम्या मागच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. साप घरात अगदी कुठेही सापडू शकतो. घरात साप दिसणे एकवेळी ठीक म्हणता येईल, पण तुम्ही टॉयलेटला बसता कमोडच्या सीटवर साप लपलेला असेल तर? तुमचे धाबेच दणाणतील. काय करु आणि कुठे जाऊ, असे तुम्हाला होऊन जाईल. पूर्वीच्या काळी खेडेगावात शौचालयाला जाताना विशेष काळजी घ्यावी लागायची. कारण ते घरापासून काहीसे दूर असायचे. याठिकाणी शेत किंवा ओसाड भाग असल्याने साप सापडण्याची शक्यता जास्त होती. शौचालयात गेल्यावर साप चावल्याच्या घटनाही घडायच्या. पण आता कमोडमध्येही साप आल्याची घटना नुकतीच घडली आणि या सापाला पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ज्याचा नुसता विचार केला तरी आपल्याला भीती वाटते, असा साप आपल्या टॉयलेटमध्ये असू शकतो. नुकतीच ऑस्ट्रेलियात अशी घटना घडली. एक व्यक्ती टॉललेटसाठी कमोडवर बसलेला असताना त्याला अचानक सापाचा आवाज आला. त्यानंतर या व्यक्तीने साप पकडणाऱ्यांना याविषयी कळवले. गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन स्नेक कॅचर्स यांनी या सापाला अतिशय शिताफीने पकडलेही. हा साप पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुरुवातीला साप पकडणाऱ्यांनी कमोडमध्ये साप वर यावा यासाठी फ्लश केले. हा साप कमोडच्या फ्लशमधून पाणी येते त्याठिकाणी कडेला अडकला होता. काही केल्या तो बाहेर योण्यास तयार नव्हता. चॉकलेटी रंगाचा हा साप लहान आकाराचा असूनही बाहेर काढण्यास त्रास होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे. त्यावेळी साप पकडणाऱ्यांनी या सापाची शेपटी पकडली आणि त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांना सापाला बाहेर काढण्यात यश आले. हा व्हिडिओ आतापर्यंत ५५ हजार जणांनी पाहिला आहे. अशाच प्रकारचा अमेरिकेतील एक व्हिडिओ मागील महिन्यात व्हायरल झाला होता आणि त्याला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.