आपण या क्षणी दहा जणांना ‘फास्ट फूड’ मधले कोणते पदार्थ त्यांच्या आवडीचे आहेत? असा प्रश्न केल्यावर किमान सहा-सात जण तरी मोमो, पाणीपुरी, बर्गर अशी उत्तरं देतील. खरंतर आपणदेखील मित्रांबरोबर कधी बाहेर गेलो तरी एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन बर्गर, नूडल्स असे पदार्थ म्हणजे जंक फूड खाणे अधिक पसंत करतो. मात्र, तुम्ही ‘मोमो, नूडल्स आणि बर्गर’ यांना कधी एकत्रित खाल्ले आहे का?
आईगं! ही पदार्थांची विचित्र जोडी ऐकूनच अंगावर शहारा आला ना? अहो, पण असा पदार्थ खरंच आहे आणि तो विकलादेखील जातो! याचा पुरावा हवा असेल तर आपलं सोशल मीडिया आहे ना. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर hnvstreetfood अकाउंटने ‘मोमो बर्गर’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हाच व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Holi 2024 : वीकएण्डला लागून आली होळी! सण साजरा करण्यासाठी या’ ठिकाणी देऊ शकता भेट
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक अत्यंत प्रसन्न चेहऱ्याचा तरुण हा मोमो बर्गर विकताना दिसत आहे. “बर्गरचा असा प्रकार विकायला सुरू करायचा हा विचार कुठून आला?” असा प्रश्न व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तीने विचारल्यावर, तरुणाने गालात हसत “मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलो, पण मला अशा पद्धतीचा बर्गर कुठेही दिसला नाही. मग म्हटलं, चला मीच सुरू करतो”, असे त्याने उत्तर दिले. आता हा बर्गर मोमो नेमका कसा बनतो ते पाहू.
तर सुरुवातीला एका मोठ्या तव्यावर बर्गरचे बन भाजले जातात. बनच्या दोन्ही भागांवर कोणतातरी मसाला, तंदुरी मेयॉनीज, नेहमीचे पांढरे मेयॉनीज घालून ते सर्व बनवर व्यवस्थित लावले जाते. आता त्यावर टोमॅटोची एक चकती आणि बर्गरची टिक्की घालून घेतो. बनच्या दुसऱ्या भागावर तीन स्टीम मोमो ठेवतो. त्यावर नूडल्सचा एक थर ठेवतो. पुन्हा त्यावर मेयॉनीज घालून अजून एक सॉस घालतो आणि बर्गर बंद करून व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला खायला देतो.
खरंतर हे सर्व वर्णन वाचून किंवा व्हिडीओ पाहून तुम्हाला ‘हा काय विचित्रपणा आहे’ असे वाटेल, मात्र नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सवरून असे अजिबात वाटत नाही. नेटकरी नेमके काय म्हणतात ते पाहू.
“वाह! खूपच भारी… मी खाल्ला आहे हा प्रकार” असे एकाने म्हटले आहे. “व्हिडीओ बघूनच तोंडाला पाणी सुटले” दुसऱ्याने लिहिले आहे. तर अनेकांनी हे कुठे विकले जाते त्याचा पत्ता विचारला आहे. तर बऱ्याच जणांनी लाल बदामाच्या इमोजी लिहिल्या आहेत.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @hnvstreetfood नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. याला आत्तापर्यंत ३२.५K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.