देशात वाहन अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. वाहन चालवताना रस्ते नियमांचे पालन करणे, वाहनातील सुरक्षा सुविधेचा वापर करणे इत्यादी सूचना वेळोवेळी संबंधित विभागांकडून केल्या जातात. मात्र सूचनांना केराची टोपली दाखवत जीव धोक्यात घालत असल्याचा प्रकार पुढे येतो. हैदराबाद येथून असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका व्हिडिओत तीन चिमुकली मुले चालत्या कारच्या उघड्या डिक्कीत बसल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडिओने नेटिझन्सला अवाक करून सोडले आहे. सोचो जरा या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला १० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून तो व्हायरल झाला आहे. व्हिडिओने प्रवाशी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
लहान मुलांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा
(Viral : कोरीयन तरुणांना ‘काला चष्माची’ भुरळ, गाण्यावर केला भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ)
व्हिडिओत तुम्हाला चालत्या कारच्या खुल्या डिक्कीमध्ये तीन मुले बसलेली दिसून येतील जे चिंतेत टाकणारे आहे. मुलांच्या सुरक्षेबाबत कार चालकाला पर्वाच नसल्याचे दिसून येत आहे. सुरक्षेच्या मुद्द्याला धाब्यावर बसवून लहान मुलांचा जीव धोक्यात घालणारे हे कृत्य संताप आणणारे आहे.
पोलिसांनी चलान काढले
व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर सायबराबाद पोलिसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या माहितीची पुष्टी झाली असून इ चलान काढण्यात आल्याचे सायबराबाद ट्राफिक पोलिसांनी ट्विट केले आहे. या घटनेवर नेटिझन्सनेही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहे.
काय म्हणाले नेटकरी?
मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या पालकांना अटक करा, असा संताप एका युजरने व्यक्त केला आहे. तर दुसऱ्याने या पालाकांवर ५ वर्षांसाठी वाहन चालवण्याची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. एका युजरने पालकांकडू वाहन चालवताना मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कसा हलगर्जीपणा होत आहे, यावर आपले मत व्यक्त केले आहे. दरम्यान, व्हिडिओत दाखवलेला हा प्रकार धोकादायक असून असे करणे चुकीचे आहे.
या घटनेने नेटकरी संतप्त झाले आहेत. पालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मुलांना सुरक्षित ठिकाणी बसवण्याएवजी त्यांचा जीव धोक्यात घालण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांंवर वाहनांची प्रचंड गर्दी असते. काही बेजबाबदार नागरिक वेगाने वाहन देखील चालवतात. एका वाहनाने दुसऱ्या वाहनाला मागून धडक दिल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांना असे चालत्या कारच्या उघड्या डिक्कीत बसवणे हा बेजबाबदारपणा असून मृत्यूला आमंत्रण देणारे कृत्य ठरू शकते.