रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ म्हणजेच ज्याला आपण स्ट्रीट फूड म्हणतो, त्यांचे आपल्या मनात एक वेगळेच स्थान आहे. कोणाला कधीही काही झटपट खावेसे वाटले, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या वडापाव, भजीपाव, पाणीपुरी, कोणतेही चाट, सॅण्डविच अशा कितीतरी वेगवेगळ्या पदार्थांची निवड करीत असतो. असे असताना प्रत्येक राज्याप्रमाणे तेथील ‘स्ट्रीट फूड’मध्ये बदलदेखील होत असतो. म्हणजे काही ठिकाणी चटपटीत पदार्थ मिळत असतात; तर काही ठिकाणी गोड पदार्थ आवडीने खाल्ले जातात.
आता जे पदार्थ रस्त्यावर विकले जात आहेत ते बहुतेकदा त्याच ठिकाणी उघड्यावर बनवले जातात. त्या खाद्यपदार्थांची चव जरी आपल्याला खूप आवडत असली तरीही आजूबाजूची घाण, त्या पदार्थावर घोंगावणाऱ्या माश्या, आजूबाजूचा रस्ता आणि विशेषतः पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तींची अवस्था बघूनच आपल्याला किळस येते. अशातच पाटणामधील एका व्यक्तीचा, इमरती बनवतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे पदार्थ बनवतानाची अस्वच्छता.
हेही वाचा : ऑर्डर केले व्हेज सॅलड; सोबत मिळाली ‘गोगलगाय’ फ्री! किळसवाण्या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या….
इन्स्टाग्रामवरील @foodie_incarnate या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला असून, सुरुवातीला व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भल्यामोठ्या पातेल्यात इमरतीचे पीठ हाताने एकत्र करताना दिसत आहे. हे करताना त्या व्यक्तीचे हात पार कोपरापर्यंत त्या पिठामध्ये बुडाल्याचे आपल्याला दिसेल. त्यानंतर काही कोळसे तो कढईखाली घालतो आणि कढईमध्ये तेल ओतून घेतो. हे सर्व करून झाल्यावर तो पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित हाताने ढवळून मग एका भल्यामोठ्या डावाने आपल्या हाताला लागलेले पीठ काढून पातेल्यामध्ये एकत्र करतो. पुढे एका कापडात तयार पीठ घेऊन, तेलामध्ये फुलाच्या आकाराप्रमाणे इमरती घालून तळून काढतो आणि शेवटी साखरेच्या पाकात घोळवून घेतो.
हा सर्व प्रकार नेटकऱ्यांनी पाहिल्यावर अनेकांना सर्व प्रकार बघून अतिशय किळस आली; तर काहींनी त्यावर फार मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहू.
एकाने, “पाणीपुरी विकणारे जसे ग्लोव्हज घालू शकतात, तसे ते का नाही घालत,” असा प्रश्न केला. दुसऱ्याने, “त्याने घाम गाळून, बनवलेल्या पदार्थाची चव नक्कीच चांगली लागेल,” अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. “स्वच्छतेला बाय बाय आणि आजारांचे स्वागत आहे,” असे तिसऱ्याने म्हटले आहे. “मी तर हे अजिबात खाणार नाही आणि अशा प्रकारचे व्हिडीओ टाकणे बंद करा. कारण- त्यामुळेच आपल्या देशाची प्रतिमा खराब होते,” असे चौथ्याने लिहिले आहे. “हातामध्ये ग्लोव्हज डॉक्टरांव्यतिरिक्त आणखी कुणीही घालत नाही. तुम्हाला जर याचा त्रास होत असेल, तर मॉलमध्ये किंवा पंचतारांकित हॉटेल्समध्ये जाऊन खा. स्ट्रीट फूड हे असेच मिळणार,” अशी प्रतिक्रिया पाचव्याने दिल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.
या व्हिडीओला आजवर २.५ मिलियन इतके व्ह्युज आणि ४४.६ K इतके लाइक्सदेखील मिळाले आहेत.