रात्री भूक लागली, मित्र घरी येणार असतील किंवा काहीही कारण असूदे, स्वयंपाकघरात आपली भूक भागवण्यासाठी मॅगीची पाकिटे सतत सज्ज असतात. अगदी कोणत्याही वेळी आवडीने या नूडल्स खाल्ल्या जातात. तसाच अजून एक पदार्थ आहे, जो आपल्या घरी सुट्टीच्या दिवशी, वाढदिवस किंवा विशेषतः घरी मित्र/पाहुणे येणार असतील तर हमखास मागवला जातो, तो म्हणजे बिर्याणी. खरंतर मॅगी आणि बिर्याणी हे दोन अतिशय वेगळे पदार्थ असले तरीही त्यांच्यामध्ये वापरले जाणारे मसाले बहुतांश सारखे असतात. बिर्याणी तयार होण्यासाठी प्रचंड वेळ आणि मेहनत घेते; तर आपली मॅगी अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होते.
मात्र, @great_indian_asmr या अकाउंटने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये बिर्याणीसुद्धा अशी टिचकी वाजवता, दोन मिनिटात बनवून दाखवली आहे. त्यासाठी त्याने काय केले पाहा. सगळ्यात पहिले सर्व भाज्या गाजर, कांदा फरसबी इत्यादी चिरून घेतो. चिरलेला कांदा पॅनमध्ये तळून त्याला तपकिरी होऊ दिले. नंतर इतर सर्व चिरलेल्या भाज्या, मटार, कढीपत्ता, मसाले, हळद, मीठ इत्यादी पदार्थ घालून सर्व व्यवस्थित शिजू देतो. त्यानंतर यामध्ये मॅगीचे तुकडे करून थोडे पाणी आणि बिर्याणी मसाला घालून झाकून घेतो. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी घेतो. अशा पद्धतीने हा व्हिडीओ शेअर केलेल्या व्यक्तीने मॅगी बिर्याणी बनवली आहे.
हेही वाचा : मॅगीवर, दही अन् शेव घालून बनवले कटोरी चाट! सोशल मीडियावर रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल….
खरंतर, हा इतर व्हायरल होणाऱ्या पार्ले जी मॅगी किंवा दही मॅगी चाटसारख्या विचित्र फूड कॉम्बिनेशन्ससारखा नसला, तरीही नेटकऱ्यांना काही हा पदार्थ पटलेला किंवा आवडलेला नाही असे त्यांनी लिहिलेल्या कमेंट्स, प्रतिक्रियांवरून समजते. काय म्हणत आहेत नेटकरी पाहा.
“मॅगी एका तासात कशी बनवावी याची रेसिपी आहे”, असे एकाने लिहिले आहे. “आधीच मॅगी दोन मिनिटांमध्ये बनत नाही, त्यातून ही व्यक्ती आता २०० मिनिटांची रेसिपी दाखवत आहे”, असे दुसरा म्हणत आहे. “मॅगीची भाजी बनवली आहे”, असे तिसऱ्याने सांगितले. चौथ्याने, “मॅगीसोबत प्रयोग करणे बंद करा” असे सांगितले आहे. तर शेवटी पाचव्याने, “अरे देवा तो पुलाव असतो, त्याला बिर्याणी म्हणणे बंद करा”, अशी विनंती केली आहे.
हेही वाचा : Viral video : ‘मोये मोये ऑमलेट’ हा कोणता नवीन पदार्थ? व्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा
@great_indian_asmr या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत १०.८ मिलियन व्ह्यूज मिळाले असून यावर ३०२K इतके लाईक्सदेखील आलेले आहेत.