आपण राहतो तिथे हलकी थंडी सुरू झाली की, लगेच आपण स्वेटर आणि मऊ पांघरुणामध्ये स्वतःला गुरफटून घेत असतो. मात्र, भारताच्या वरच्या बाजूस असणारे काश्मीर, श्रीवर्धन, हिमाचल, लेह-लडाख यांसारख्या जागा हिवाळ्यामध्ये बर्फाने अतिशय मनोहारी सौंदर्याने भरून गेलेल्या असतात. तेथील हवामान, बर्फ, विविध पदार्थ, ताजी हवा या सगळ्यांमुळे अनेक पर्यटक तेथील थंडी अनुभवण्यासाठी, बर्फामध्ये मजा करण्यासाठी हमखास तेथे जात असतात. या सर्व जागा अतिशय नयनरम्य आणि जादुई असल्यासारख्या वाटतात. आपल्या मित्रांसोबत, जवळच्या व्यक्तींसोबत अशा वातावरणात शेकोटीजवळ गप्पा-गाणी म्हणत वेळ घालवण्यात खूप मजा येते.
सोशल मीडियावर सध्या बर्फातील किंवा तिथल्या मोठमोठ्या पहाडांच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु, या सगळ्यांमध्ये एक व्हिडीओ असा आहे की, ज्याने सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ अतिशय साधा आणि काही सेकंदांचा असला तरीही त्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीचे नेटकऱ्यांना फारच आश्चर्य वाटले आहे.
हेही वाचा : लग्नाआधीचे फोटोशूट चांगलेच राहील लक्षात; फोटो काढताना अचानक ‘या’ पाहुण्याने लावली हजेरी, पाहा व्हिडीओ
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @unitedhimalayas या अकाऊंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने पाण्याची भरलेली बाटली एकदाच वर खाली केली आणि अगदी जादूप्रमाणे त्या बाटलीमधील पाणी वरपासून गोठण्यास सुरुवात होऊन दोन ते तीन सेकंदांमध्ये खालपर्यंत गोठून गेल्याचे दिसते. हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशमधील काझा स्पिती व्हॅलीमध्ये शूट केला गेलाय, तेव्हा तेथील तापमान हे उणे २४ अंश सेल्सियस इतके होते, असे त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले आपल्याला दिसेल.
काझा स्पिती व्हॅली ही जागा समुद्रसपाटीपासून ११,९८० फूट इतक्या उंचीवर आहे. त्यामुळे इथले तापमान अतिशय कमी असते. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर नेटकरी अतिशय चकित झाल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून समजते.
एकाने, “तुमचा हात कसा गोठत नाहीये,” असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्याने, “हे एक रसायन आहे; जे असे वर-खाली केल्यानंतर गोठल्यासारखे दिसते,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही जेव्हा लेहला गेलो होतो, तेव्हा तिथल्या उणे ४० तापमानामध्ये तर नाही झालं असं काही,” असे तिसरा म्हणतो. चौथ्याने, “ही कोणतीही ट्रिक नाहीये. त्यामागे विज्ञान आहे. तुम्ही जर पाण्याच्या बाटलीला ते गोठेल इतक्या तापमानामध्ये घेऊन गेलात आणि त्याला थोडेसे हलवले, तर बर्फाचे लहान कण संपूर्ण बाटलीमधील पाण्याला गोठवतात,” असे स्पष्टीकरण दिले. तर काही जण हा व्हिडीओ रिव्हर्स आहे किंवा कोणत्या तरी फिल्टरचा वापर केला आहे, असे म्हणत आहेत.
@ridarmilan.official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा मूळ व्हिडीओ शेअर झाला असून, @unitedhimalayas पुन्हा शेअर केलेल्या या व्हिडीओला २ लाख इतके व्ह्युज मिळिले असून, खूप मोठ्या प्रमाणात कमेंट्स आलेल्या आहेत.