जुगाड करणे, विविध युक्त्या करून एखादी गोष्ट तयार करणे किंवा चित्र-विचित्र प्रयोग करण्यात कुणीही भारतीयांचा हात धरू शकत नाही. असाच एक सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुण मुलाने चक्क आपल्या हाताच्या बोटाने स्वयंपाकघरातील गॅस स्टोव्ह पेटवल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.
@Madan_chikna या एक्स [पूर्वीचे ट्विटर] वापरकर्त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार एक मुलगा स्वयंपाकघरात ओट्यापाशी एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलेला आहे. गॅस चालू ठेवून, त्याने त्यावर आपले एक बोट रोखून धरले आहे. दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या डोक्यावरून मऊ / लोकरीची चादर फिरवताच गॅस स्टोव्ह पेटतो. आता असे होण्यामागचे कारण म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असू शकते, असे व्हिडीओखाली दिलेल्या कॅप्शनवरून समजते.
‘स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा [स्थिर ऊर्जा] वापर करून या तरुणानं चक्क गॅस स्टोव्ह पेटवला आहे. खरंच भारतात साधीसुधी माणसं राहत नाहीत,’ अशा आशयाची कॅप्शन या व्हिडीओखाली आपल्याला वाचायला मिळेल.
हेही वाचा : Viral video : याला म्हणतात जुगाड! पाहा तासंतास फोन पाहण्यासाठी तरुणीने वापरलेली ‘ही’ भन्नाट युक्ती….
अनेकदा आपल्यालाही विशेषतः थंडीच्या किंवा कोरड्या दिवसांमध्ये असा अनुभव आला असेल. म्हणजे तुम्ही लोकरीचे, मऊ कपडे घालून बराच वेळ खुर्चीत बसला असाल आणि अचानक तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या वस्तूला, दाराला, अगदी एखाद्या व्यक्तीला जरी स्पर्श केलात किंवा त्यांच्या बाजूने जरी गेलात तरी तुम्हाला हलकासा विजेचा करंट किंवा झटका बसल्याचे जाणवते. तसेच काहीसे या व्हिडीओमध्ये मुलाने केले असण्याची शक्यता आहे.
तो मुलगा प्लास्टिकच्या खुर्चीवर बसल्याने नकळत तो वीज वाहक बनला आणि जेव्हा मऊ चादर त्याच्या डोक्यावर घासली गेली तेव्हा त्यातून तयार झालेली वीज त्याने गॅसजवळ रोखून धरलेल्या बोटामधून बाहेर पडली. परिणामी गॅसच्या लायटरप्रमाणे त्याच्या बोटाने आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या स्थिर ऊर्जेच्या ठिणगीने गॅस स्टोव्ह पेटवण्यास मदत केली, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून मिळाली.
मात्र कृपया हा प्रयोग कुणीही घरी करून पाहू नये.
हेही वाचा : खाद्यप्रेमींसाठी नवा ‘Fusion’ पदार्थ होतोय व्हायरल; ढोकळ्यासह केलेल्या प्रयोगावर नेटकरी म्हणाले…”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहा.
एकाने, “ही भन्नाट कल्पना भारताबाहेर गेली नाही पाहिजे,” असे लिहिले आहे. दुसऱ्याने, ” ‘मग मी काय माझं काम सोडून येऊ,’ असा प्रश्न लायटर करील” अशी मिश्कील प्रतिक्रिया लिहिली आहे. “या व्हिडीओवर चेतावनी द्यायला हवी. कारण- लोक विचार न करता, हा प्रयोग करायला जातील,” अशी काळजीयुक्त सूचना केली आहे.
एक्सवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ७३०.६K इतके व्ह्युज मिळाले आहेत.