पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी योजनांचा फायदा मिळालेल्या गुजरातमधील लाभार्थ्यांसोबत आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. मात्र यावेळी अंशत: अंधत्व आलेल्या एका व्यक्तीच्या मुलीचं बोलणं ऐकून पंतप्रधान मोदींना गहिवरुन आलं. आपल्या मुलीने डॉक्टर झालं पाहिजे हे स्वप्न उराशी बाळून असलेल्या या दिव्यांग व्यक्तीच्या मुलीशी बोलताना पंतप्रधानांना भावना अनावर झाल्या आणि ते बोलता बोलता कंठ दाटून आल्याने भाषणादरम्यानच थांबले.
मोदींनी आयूब पटेल नावाच्या व्यक्तीशी संवाद साधताना तुम्ही तुमच्या मुलींना शिकवता की नाही असा प्रश्न विचारला. यावेळी आयूब यांनी आपल्या तिन्ही मुलींनी शालेय शिक्षण घेतलं असून त्यावेळेस त्यांना सरकारील शिष्यवृत्ती मिळाली होती, असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना माझी सर्वात छोटी मुलगी जी आता बारावीला आहे ती डॉक्टर होणार आहे असं आयूब यांनी सांगितलं.
आयूब यांचं उत्तर ऐकून पंतप्रधान मोदींनी त्या मुलीला तुला डॉक्टर का व्हायचंय असं विचारलं. त्यावर उत्तर देताना मुलीने “माझ्या वडीलांना असणारी (दृष्टीसंदर्भातील) अडचण सोडवण्यासाठी मला डॉक्टर व्हायचंय,” असं सांगितलं. आयूब यांनी यापूर्वीच पंतप्रधान मोदींशी बोलताना आपल्याला कमी दिसत असल्याची माहिती दिली. सौदी अरेबियामध्ये कामाला असताना डोळ्यांमध्ये टाकलेल्या काही औषधी ड्रॉप्सच्या साईड इफेक्टमुळे दृष्टीवर परिणाम झाला अन् आपल्याला अंशत: अंधत्व आल्याचं आयूब म्हणाले.
हे सर्व ऐकून पंतप्रधान मोदींना काय बोलावं हेच सुचलं नाही आणि बोलता बोलता त्यांना गहिवरुन आलं. ते तोंडावर हात ठेवून बराच वेळ बसले होते. ते काहीही बोलत नव्हते. मात्र नंतर त्यांनी या मुलीचं कौतुक केलं. तुझी इच्छाशक्ती ही तुझी ताकद आहे, असं मोदींनी या मुलीला सांगितलं.
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी ईद आणि रमझानचा उत्सव कसा साजरा केला याबद्दल चौकशी केली. तसेच तुमच्या मुलीला भविष्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तर मदत करण्यासाठी आपण तयार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. “तुम्हाला त्यांची स्वप्न पूर्ण करावी लागतील,” असं मोदींनी आयूब यांना सांगितलं. आयूब यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाची सत्ता आल्यापासून मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळू लागल्याचा उल्लेख केला.