अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील एक धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद झालाय. डोंगराळ भागामधील एका सायकलच्या शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला रानटी बैलाने (वळू) धडक दिल्याची घटना सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. टोनी इंडरबीटझीन असं हल्ला झालेल्या सायकलस्वार स्पर्धकाचं नाव असून हा सर्व प्रकार बियांची रॉक कॉबलर शर्यतीदरम्यान घडलाय. बाकेरफिल्ड प्रांतामधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
ऑफ रोड म्हणजेच डोंगराळ भागामधील सायकलींगसाठी लोकप्रिय असणारा हा ट्रॅक जगातील सर्वात खडतर आणि धोकादायक सायकलींग ट्रॅक्सपैकी एक आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार १२८ किलोमीटरचा हा ट्रॅक डोंगर रांगामधून वन्य प्राण्यांचा वावर असणारा हा ट्रॅक आहे. या ट्रॅकवर दरवर्षी सायकल शर्यत आयोजित केली जाते. याच शर्यतीदरम्यान बैलाने टोनी नावाच्या सायकलस्वाराला धडक दिल्याचा प्रकार घडलाय.
रिचर्ड पीपर नावाच्या अन्य एका स्पर्धकाने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. या व्हिडीओमध्ये सायकलस्वार डोंगर उतारावरुन खाली येताना दिसतोय. हा सायकलस्वार जात असणाऱ्या मार्गाजवळ एक बैल उभा असल्याचं दिसतं. सायकलस्वार बैलाजवळ जाताच बैल त्याला धडक देऊन पाडतो. आपल्या शिंगांनी तो सायकलस्वाराला हवेत भिरकावून देताना दिसतो.
या अपघातानंतर आपलं अंग फार दुखत होतं असं टोनीने म्हटलं आहे. आधी माझी मान दुखत होती. मात्र आता माझ्या पाठीला दुखापत झाल्यासारखं वाटतंय, असं टोनीनं म्हटलं आहे.
यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. पाहुयात काही मोजक्या प्रतिक्रिया…
या अपघाताबद्दल बोलताना आयोजकांनी यापूर्वीही अनेकदा सायकलस्वार अशाप्रकारे वन्य प्राण्यांच्या जवळून गेलेत पण असा प्रकार कधीच घडला नसल्याचं म्हटलंय. दुसरीकडे टोनीला या घटनेमुळे स्पर्धा पूर्ण करता आली नसली तरी पुढील वर्षी आपण पुन्हा सहभागी होणार असल्याचं त्याने सांगितलंय.