School Principal Thrown Out Of Chair Video: पेपर लीक प्रकरणाने यंदा लोकसभेत, महाराष्टाच्या विधानसभेत गदारोळ झाला होता. विरोधक विरुद्ध सत्ताधारी यांच्यात अगोदरच पेटलेल्या वादात या पेपर लीक प्रकरणाने तेल ओतण्याचे काम केले असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणाj नाही. देशात नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची चर्चा असताना आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील एका शाळेत पेपर लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. खरं सांगायचं तर, अशा अनेक घटना देशभरातुन नेहमीच समोर येत असतात. पण यावेळी कारवाई करताना दाखवलेली चपळाई व त्याहूनही संबंधित मुख्याध्यापिकेला कार्यालयातून काढून टाकण्यासाठी अवलंबलेली पद्धत जास्त चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेपर फुटीच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून प्रयागराजमधील शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्यात आली. तिला कामावरून काढून टाकल्यानंतर कार्यालयातून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले. या गोंधळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. शहरातील बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूल अँड कॉलेजमध्ये ही घटना घडली असल्याचे समजतेय. यावर्षी ११ फेब्रुवारी रोजी पेपर लीक झाल्याची घटना घडली होती. सकाळी ६.३० च्या सुमारास कोषागारातून वर्गांपर्यंत पेपर घेऊन जात असताना त्याच दरम्यान पेपर लीक झाला होता.

‘पेपर लीक’ टोळीचा म्होरक्या कमलेश कुमार पाल उर्फ ​​केके याने कथितरित्या फोटो काढले आणि परीक्षेपूर्वी लीक केले होते. या प्रकरणी जवळपास १० जणांना अटक करण्यात आली होती. तपासात पारुल सोलोमन या शाळेच्या मुख्याध्यापिकेचे नावही समोर आले होते त्यानंतर आता तिला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पारुल यांच्या जागी शाळेने शर्ली मॅसी या नव्या मुख्याध्यापिकेची नियुक्ती सुद्धा केली होती मात्र त्यानंतरही पारुल आपली जागाच सोडायला तयार नव्हत्या. आपल्या खुर्चीवर अडून बसलेल्या मुख्याध्यपिकेला कार्यलयातून बाहेर काढताना झालेला गोंधळ सध्या ऑनलाईन पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या खटल्यातील एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, पारुल यांनी आपल्यावरील कारवाईबाबत माहिती मिळताच मुख्याध्यापिकेच्या कार्यलायाला आतून कुलूप लावले होते. काही शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून कार्यालयात प्रवेश केल्यावरही ती खुर्चीवर अडून बसली होती. पण सर्वांनी पारुलला खेचून खुर्चीवरून हटवले आणि नवीन प्राचार्य मॅसी यांना खुर्चीवर बसवले, त्यानंतर कर्मचारी सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

इंडियन एक्सस्प्रेसने प्रयागराजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक राजीव कुमार यादव यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या याप्रकरणी तपास सुरु असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. कथित घटनेच्या व्हिडीओमध्ये, एक गट जबरदस्तीने मुख्याध्यापिकेच्या खोलीत प्रवेश करत ताबडतोब खुर्ची रिकामी करण्याची मागणी करताना स्पष्ट दिसतेय.या वादात एका क्षणी, एक व्यक्ती त्या महिलेला, “तुम्ही मुख्याध्यापिका नाही आहात” असे सांगताना दिसतेय. पारुल यांच्या विरोधानंतरही हा गट त्यांना जबरदस्तीने खुर्चीतून खेचून बाहेर काढतो.

पारुलने या प्रकरणानंतर कर्मचारी सदस्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे काही कर्मचारी आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या पक्षाची चौकशी केली असता, त्यांनी सोलोमन यांनी प्राचार्यपदाच्या कार्यकाळात शाळेतील २.४ कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video school principal forcibly removed over paper leak allegations makes dangerous chaos locks herself blames molestation watch danger drama svs
Show comments