तुम्ही स्कूटर चालवत असताना अचानक कार समोर आल्यास तुम्ही काय करता? ब्रेक दाबता बरोबर. पण चीनमधील जिंगसू प्रांतामध्ये वेगवान स्कूटरला अचानक ब्रेक दाबल्याने स्कूटरवरील तीन व्यक्तींचा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हे तिघे एकाच कुटुंबातील होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओमध्ये हा अपघात कसा झाला हे स्पष्टपणे दिसतेय. रस्त्याच्याकडेला उभी असणारी गाडी यु-टर्न घेत असताना समोरून वेगाने येणाऱ्या स्कूटरच्या चालकाने संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्कूटरचा ब्रेक दाबला. यावेळी स्कूटरवर त्याच्या मागे एक स्त्री आणि पुढे एक लहान मुलगी उभी होती. हा ब्रेक इतक्या जोरात दाबला की स्कूटरचे मागचे चाक वर उचलले गेले आणि स्कूटर पुढच्या दिशेला आपटली.
अपघातानंतर तिघेही सुखरुप असल्याचे व्हिडीओत दिसते. त्यानंतर पडलेली स्कूटर उचलण्यासाठी गेलेल्या चालकाला पुन्हा एक विचित्र अनुभव आला. स्कूटर उचलताच अनियंत्रित पद्धतीने ती इकडेतिकडे धावू लागली. तिला संभाळण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला मात्र ती काही नियंत्रणात येण्यास तयारच नव्हती. अखेर चालकाने ही स्कूटर सोडून दिली तर काय आश्चर्य ती काही मीटरपर्यंत वेगाने धावत जाऊन दुसऱ्या कारला धडक देऊनच पडली. या व्हिडीओबद्दल काहीजणांनी आश्चर्य व्यक्त केले असून काही ट्रोलर्सने गाडीच्या बेभान धावण्यावरून मस्करीही सुरु केली.